नाशिक दिनांक १० डिसेंबर :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालया अंतर्गत जिल्हा क्रीडा अधीकारी कार्यालय नाशिक मार्फत दिनांक ०८ ते १० डिसेम्बर, २०१९ दरम्यान १७ वर्षे मुले आणि मुलींच्या ६५ व्या राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करुन या स्पर्धेमध्ये मुलांचे आणि मुलींचे दोन्हीही सर्वसाधारण विजेतेपदवर आपले नाव कोरले आणि दुहेरी मुकुट मिळविला. महाराष्ट्राच्या मुलांनी सांघिक स्पर्धेत सॅबर या प्रकारात सुवर्णपदक, फॉईलमध्ये रजत पदक तर ई .पी. ,प्रकारात कास्य पदक मिळवित १८ गुण मिळविले आणि वैयक्तिक प्रकारात फॉईलमध्ये सुवर्णपदक, सॅबर मध्ये रजत आणि कास्य पदकासह नऊ गुण मिळवीत एकूण २७ गुण आपल्या नावे करून मुलांच्या सर्वसाधारण विजेतेपदावर आपले स्थान पक्के केले.
महाराष्ट्रा खालोखाल हरियाणा आणि मध्य प्रदेशच्या संघानी १३ -१३ असे समसमान गुण मिळविल्यामुळे या दोन्हीही संघांना संयुक्त सर्वसाधारण उपविजेतेपद देण्यात आले. तर मणिपूरच्या मुलांनीही चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून १२ गुण मिळवत तिसरे स्थान मिळविले.
मुलींमध्येही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुंदर खेळ करून सर्वात जास्त गुणांची कमाई केली. सांघिक प्रकारात फॉईल आणि सॅबर या दोन्हीही प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वर्चस्व राखून या प्रकारामध्ये सुवर्णपदक पटकावले. तर ई. पी. मध्ये महाराष्ट्राने रजत पदक मिळवत २६ गुण मिळविले आणि वैयक्तिक स्पर्धेत फॉईल आणि सॅबर या दोन प्रकारात महाराष्ट्राच्या वैदेही लोढा आणि कशिश भराड यांनी सुवर्ण पदक तर प्रियांका लोढाने कास्य पदक मिळवून तब्बल ३८ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपदावर आपली मोहर उमटवली. मुलींमध्ये गुजराथने २४ गुणांसह उपविजेतेपद तर मणिपूरने १३ गुणांसह तिसरे स्थान मिळविले.
विजयी खेळाडूंना प्रमुख अतिथी आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त धावपटू मोनिका आथरे , संजिवनी जाधव, नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, छत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक आनंद खरे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, शालेय क्रीडा महासंघाचे प्रतिनिधी परमेश्वर जाठ आदींच्या हस्ते आकर्षक चषक, आणि मेडल्स प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी मोनिका आथरे हीने सांगितले की खेळाडूंनी कठोर मेहनत केल्यास यश निश्चित मिळते, मी देखील खेळाडू असल्यामुळे हे सांगते आहे असे नमूद करून विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले. यावेळी संजिवनी जाधव आणि चंद्रकांत कांबळे यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन करून त्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक स्पर्धेचे आयोजक तथा जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले. तर आभार राजेश प्रदर्शन राजेश क्षत्रिय यांनी केले.
या स्पर्धेची तांत्रिक बाजू साई सेंटरचे प्रशिक्षक तुकाराम मेहेत्रे आणि राजू शिंदे आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रशिक्षक अजिंक्य दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय तलवारबाजी असोसिएशनचे पंच, आणि तांत्रिक सदस्य यांनी यशस्वीपणे सांभाळली.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, क्रीडा अधिकारी प्रकाश पवार, खिल्लारे, महेश पाटील, अरविंद चौधरी, सौ कांबळे, संदीप ढाकणे, श्रीमती उदार, सय्यद , जिल्हा तलवारबाजींचे सचिव राज्य शिंदे, उपाध्यक्ष नितीन हिंगमिरे, अजिंक्य दुधारे, जय शर्मा, राहुल फडोळ आणि सर्व सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले.
स्पर्धाचा निकाल :-
मुले –
१) सर्वसाधारण विजेतेपद – महाराष्ट्र ( २७ गुण )
२) सर्वसाधारण उपविजेतेपद – हरियाणा आणि एम. पी. ( दोघांनाही १३ गुण )
३) सर्वसाधारण तिसरा क्रमांक – मणिपूर ( १२ गुण )
मुलीं –
१) सर्वसाधारण विजेतेपद – महाराष्ट्र ( ३८ गुण )
२) सर्वसाधारण उपविजेतेपद – गुजराथ ( २४ गुण )
३) सर्वसाधारण तिसरा क्रमांक – मणिपूर ( १३ गुण )






