नाशिकरोड परिसरातील नागरिकांमध्ये व्यायामाबरोबरच आहाराबाबत जनजागृती व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रथमच प्रोफेशनल मॅरेथॉन – नाशिक रोड रन फॉर फन चे आयोजन उद्या रविवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. मेरेथॉनची सुरुवात व पारितोषिक वितरण समारंभ ईगल स्पोर्ट क्लब ग्राउंड येथे होणार आहे आणि त्याचा मार्गक्रमण हा देवळाली गाव, लॅम रॊड परिसरातून होणार आहे. ह्या आयोजनासाठी विशो फिटनेस मंत्रा ह्या फिटनेस आणि मॅरेथॉन रनींग ट्रेंनिंग देणाऱ्या संस्थेमार्फत पुढाकार घेण्यात आला आहे. नियमित व्यायामाबाबत जागरूकता ही वाढत चाललेली आहे, नाशिक शहराचे हवामान हे मॅरेथॉन – लांब पल्ला धावणाऱ्या धावपटूंसाठी अतिशय उपयुक्त आहे. नाशिकचे धावपटू राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली किमया दाखवत आहेत. धावणे हा प्रत्येक क्रीडा प्रकारचा गाभा आहे. नियमित तंत्र शुद्ध सराव आणि प्रतियोगिता मधील सहभागाने आत्मविश्वास वाढतो. त्यासाठी वेळो वेळी प्रतियोगितेचे आयोजन होणे महत्वाचे असल्याचं आयोजक विशाल मोटकरी ह्यांनी सांगितले. मॅरेथॉनच्या मार्गक्रमणादरम्यान नाशिकरोड वासियांनी वाहतुकीस सहकार्य करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
मॅरेथॉनच्या माध्यमातून पुरुष, महिला, तरुण, वृद्ध तसेच दिव्यांग लोक एका व्यासपीठावर येतात आणि त्यातून सामाजिक एकता समानतेची भावना निर्माण होते. नाशिक रोड रन फॉर फन मध्ये फॅमिली फन रन पासून ते व्यावसायिक प्रतियोगितेचा समावेश आहे, प्रथमच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष गट निर्माण करण्यात आला आहे. यात ३, ५, आणि १० किलोमीटरचा समावेश असणार आहे. प्रत्येक सह्भागीस बक्षिसे, टी -शर्ट, स्पर्धा पूर्ण करणाऱ्यासाठी पदक, विज्येत्यास रोख बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर अचूक वेळ नोंदविण्यासाठी RFID ह्या प्रणालीचा उपयोग करण्यात येणार, ही प्रणाली वापरणारी नाशिकरोड परिसरातील ही पहिली प्रतियोगिता असेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.






