सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शेकडो वर्षांपासून ग्राहकांना नव्या सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. त्याचबरोबर आपण समाजाप्रती देखील काही देणं लागतो त्यामुळे सेंट्रल बँक ऑफ इंडिया विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजाप्रती असलेले ऋण वेळोवेळी फेडत असते. त्याचाच एक भाग म्हणून कोरोना महामारी सोबत दोन हात करत असताना पोलीस प्रशासन आपली जबाबदारी कर्तव्यदक्षपणे पार पाडत आहे. त्यामुळे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि टाटा एआईए विमा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक उपक्रमांतर्गत ऑगस्ट – २०२० या महिन्यात ‘माझा देश माझं योगदान’ उपक्रम चालविला गेला होता. या उपक्रमांतर्गत झालेल्या एकूण व्यवसायामधून कोविड-१९ च्या योध्यांसाठी सुरक्षात्मक साधनांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट ठरविले होते.
याचाच एक भाग म्हणून नाशिक वाहतूक नियंत्रक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त श्री. मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत सेंट्रल बँक ऑफ इंडिया, नाशिक चे क्षेत्रीय प्रबंधक श्री मनोज कुमार यांच्या हस्ते ट्राफिक पोलिस जवानांना फेस शील्ड व मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी मंगलसिंग सूर्यवंशी यांनी सेंट्रल बँक राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. याप्रसंगी बँकेचे श्री. हितेंद्र धूमाल व श्री भूषण जोशी हे अधिकारी उपस्थित होते.





