नाशिक :- खाशाबा जाधव यांनी सन १९५२ च्या हेलसिंकी, फिनलंड येथे झालेल्या ऑलीम्पिक स्पर्धेत भारताला पाहिले वैयक्तिक पदक मिळवून दिले आहे. खरं तर त्यांची ही कामगिरी फार मोठी आणि मोलाची आणि सर्वांना प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्याच्या या कामगिरीची दखल घेऊन नाशिकच्या कालिका देवी ट्रस्ट, क्रीडा साधना आणि डी. एस. फौंडेशन यांच्या वतीने मागील दोन वर्षांपासून १५ जानेवारी हा त्यांचा जन्म दिवस ” महाराष्ट्र क्रीडा दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. पहिल्या वर्षी या संस्थांनी स्व. खाशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजीत यांच्या हस्ते नाशिकमधील ७६ कुस्तीपटूंचा सन्मान करून हा महाराष्ट्र दिन साजरा केला होता. तर मागील वर्षी नाशिक जिल्हातील विविध शैक्षणिक संस्था , शाळा, महाविद्यालये यांचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य अश्या ३५ मान्यवरांना सन्मानित करण्यात आलेहोते. यावर्षीही या तिसऱ्या महाराष्ट्र दिनानिमित्त दिनांक १५ जानेवारी रोजी दुपारी ०४.०० वाजता कालिका देवी मंदिरच्या हॉलमध्ये या
महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिक जिल्हातील शाळा, महाविद्यालये यांचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य अश्या २५ मान्यवरांना सन्मानित करण्यात
येणार आहे.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, कालिका मंदिर देवी ट्रस्टचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक साहेबराव पाटील, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे सुवर्णपदक विजेते शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त गोरखनाथबलकवडे आदी मान्यवरांच्या हस्ते याचा सन्मान करण्यात येणार आहे.






