श्री यशवंत व्यायाम शाळा आणि टेबल टेनिस प्रशिक्षक आणि संघटक शशांक वझे यांच्या वतीने दरवर्षी क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान असलेल्या मान्यवरांचा गेल्या ११ वर्षांपासून सन्मान करण्यात येतो. या १२ व्या वर्षी नाशिकच्या, महाराष्ट्राच्या, राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळात मोलाचे योगदान असलेले मा. रतिलाल श्रीमलं मेहर तथा बाबा मेहेर यांचा आणि क्रीडांगणासाठी सेवा देणारे तज्ञ म्हणून गेले तीन तप कार्यरत असलेले अण्णा दगा सोनावणे तथा अप्पा सोनावणे यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दिपक पाटील, नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवीन्द्र नाईक, क्रीडा संघटक आनंद खरे , या कार्यक्रमाचे आयोजक टेबल टेनिस प्रशिक्षक शशांक वझे यांच्या हस्ते बाबा मेहेर आणि अप्पा सोनावणे यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन या दोन मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला क्रीडा संघटक रवींद्र मेतकर, राजू शिंदे, माणिक सोनावणे, प्रा. बी. डी. साळुंके, प्रा. दिलीप लोंढे, प्रा. मोरे, राजेश क्षत्रिय, अविनाश ढोली, भास्कर कवीश्वर, योगेश शिंदे, सतीश कांबळे, मकरंद देव, घनश्याम कुवर, दिलीप मेहेर आदीं मान्यवर उपस्थित होते.
बाबा मेहेर हे गेल्या ५० वर्षांपासून विविध खेळासाठी वेगवेगळ्या स्तरावर कार्यरत आहेत. यावेळी सत्काराला उत्तर देतांना बाबा मेहेर यांनी सांगितले की आपल्या भारतातच खेळाविषयी भरपूर ज्ञान आणि माहिती उपलब्ध आहे. याचा फायदा आपल्या आत्ताच्या खेळाडूंना करून घेतला पाहिजे असे सांगितले आणि अगदी सन १९७६-७७ पासूनचे महत्वाचे दाखले दिले. त्यांनी खेळाच्या माध्यमातून प्रशिक्षक म्हणून राज्य , राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे काम केले आहे, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सेमीनारमध्ये सहभाग घेऊन प्रबंध सादर केले आहेत, त्याचप्रमाणे भारताचे दिग्गज खेळाडू, प्रशिक्षक प्रकाश पदुकोण. सुनील गावस्कर आणि अश्या बऱ्याच व्यक्तींशी खेळाविषयी केलेल्या संवादांची माहिती दिली. तसेच आपल्याकडे टॅलेंट आहे परंतु प्रगत देशाप्रमाणे त्या टॅलेन्टला योग्य दिशा देण्याची गरज आहे असे सांगतले.
जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक यांनी सांगितले की मी गेल्या चार वर्षांपासून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. या चारही वर्षी मला माझ्या मार्गद र्शनकांचा सत्कार करायला मिळतो हे मी माझे भाग्य समजतो. त्यामुळे बाबा मेहेर सरांसारख्या जाणकारांकडून आपण माहिती आणि ज्ञान घेऊन क्रीडा क्षेत्रात प्रगती केली पाहिजे असे सांगितले.
दिपक पाटील यांनी सांगितले बाबा मेहेर आणि अप्पा सोनावणे यांचे खेळासाठीचे योगदान फार मोठे आहे. बाबा मेहेर यांची मालेगांव बरोबरच काही वर्षे नाशिकमध्येही सेवा लाभली असती तर त्याचा फायदा नाशिकच्या खेळाडूंना झाला असता. यशवंत व्यायाम शाळेच्या माध्यमातून जुन्या – नव्याचा मिलाप करून क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्याचा आमचा मानस आहे असे सांगितले. यावेळी प्रा. दिलीप लोंढे, माणिक सोनावणे, भास्कर कवीश्वर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि सत्कारार्थीचा परिचय आनंद खरे यांनी करून दिला. आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे संयोजक शशांक वझे यांनी केले.






