१२ सप्टेंबर पासून जपान येथे सुरू असलेल्या २१ व्या आशियाई व्हॉलीबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इराणने यजमान जपानला पराभूत करून सलग दुसऱ्या विजेतेपदावर आपले नांव कोरले. इराणने या स्पर्धेसाठी आपले दिग्गज खेळाडू सईद मरौफ, मोहम्मद मौसावी, अमीर गफोर मरांडी यांच्या ऐवजी आपल्या तरुण खेळाडूंना साधी दिली. या संधीचे सोने करून या नव्या दमाच्या खेळाडूंनी अगदी अटीतटीच्या या सामन्यात जपानला २७-२५, २५-२२ आणि ३१-२९ असे पराभूत करून विजेतेपदाला गवसणी घातली. इराणच्या विजयात महत्वाची भूमिका असेलल्या साबेर काझमी याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. या स्पर्धेतील पाहिले दोन क्रमांक मिळविल्याबद्दल इराण आणि जपान या दोन संघांना २०२२ मध्ये रशिया येथे होणाऱ्या विश्वचषक व्हॉलीबॉल स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे.
इराणचे आशियाई स्पर्धेचे हे चवथे विजेतेपद आहे. तर उपविजेत्या जपानने या आधी ९ वेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले आहे. ब्राँझ पदकासाठी झालेल्या सामन्यात चीनने चायना तैपे संघाला सरळ ३-० असे पराभूत करून ब्राँझ पदक मिळविले.
भारताला ९वे स्थान :- ९ व्या क्रमांकासाठी खेळल्या गेलेल्या चित्तथराक सामन्यात भारताने बहरीनचा ३-२ असा पराभव करून ९ वे स्थान मिळवले.
१६ संघाचा समावेश असलेल्या या स्पर्धेच्या गटवार साखळीमध्ये भारताला “अ” गटातील तीन सामन्यात विजय मिळविण्यात अपयश आले होते.
भारताला साखळी स्पर्धेत “अ” गटात प्राथमिक फेरीत बहरीनकडून ०-३ च्या निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले होते.
या पराभवामुळे भारताला पहिल्या आठ संघामध्ये स्थान मिळाले नाही. त्यामुळे त्यांना दुसऱ्या टप्याच्या ९ ते १२ क्रमांकासाठी खेळणे क्रमप्राप्त झाले. या टप्यातील दोन सामन्यात भारताने अनुक्रमे कुवेत आणि कझाकीस्थान यांना सरळ ३-० असे पराभूत केले. या दोन विजयामुळे भारत ९ व्या क्रमांकासाठी सामन्यासाठी पात्र ठरला. आणि योगायोगाने या ९ व्या स्थानासाठी भारताला पुन्हा बहरींनशी सामना करावा लागला.
या सामन्यात मात्र भारताने आपल्या चुका सुधारून चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून पहीले दोन सेट २५-१६ ,२५-२३ असे जिंकून २-० अशी आघाडी मिळवली. परंतू बहरींनने चांगली मुसंडी मारून तिसरा आणि चवथा सेट २५-२०, २५-२३ असे जिंकून २-२ अशी बरोबरी साधली. त्यामुळे ५ व्या सेटमध्ये चांगला खेळ करणे भारतासाठी क्रमप्राप्त होते. या सेटमध्येही बरेच चढ- उतार बघायला मिळाले. शेवटी १४-१४ अश्या बरोबरीनंतर महत्त्वाच्या क्षणी भारताने दोन गुण मिळवत हा सेट १६-१४ असा जिंकून हा सामनाही आपल्या नावे करून आपले ९ वे स्थान पक्के केले.
भारताच्या या विजयात राज अश्वालने चांगले स्मेशेस लगावून आपल्या अटॅकच्या जोरावर १९ गुण मिळवले, तर महत्त्वाच्या वेळी चांगले ब्लॉक करून ५ गुण अश्या प्रकारे अष्टपैलू कामगिरी करून आपल्या संघाला २४ गुण मिळवून दिले. शुभम चौधरीने १९ तर चार्ल्स जेरोम विनीथने १८ गुण मिळवत आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाची कामगिरी केली. या विजयामुळे भारताने आपला साखळीतील पराभवाची परतफेड करून ९व्या स्थान मिळवले.या पराभवामुळे बहरीनला १० व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
इराण येथे झालेल्या २०व्या आशियायी स्पर्धेत भारताचे ८ वे स्थान होते.
स्पर्धेचा अंतिम निकाल :-
विजेता : इराण
उपविजेता : जपान
तिसरे स्थान: चीन
चौथे स्थान: चायना तैपी
पाचवे स्थान: कतार
सहावे स्थान : ऑस्ट्रेलिया
सातवे स्थान : पाकिस्तान
आठवे स्थान : दक्षिण कोरिया
नववे स्थान : भारत
दहावे स्थान : बहरीन.






