नाशिक :- नाशिक जिल्हा तलवारबाजी (फेंसिन्ग) असोसिएशनच्या वतीने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या सहकार्याने शनिवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२१ रोजी वरिष्ठ गटाच्या पुरुष आणि महिलांसाठी नाशिक जिल्हा तलावारबाजी अजिंक्यपद स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा नाशिकच्या शिव छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या प्रशिक्षण केंद्र येथे होणार आहेत. सकाळी १० वाजता स्पर्धांना सुरवात होईल. या स्पर्धेतून निवड झालेल्या खेळाडूंचे १८ ते २२ ऑक्टोबर दरम्यान शिबीर घेतले जाईल. त्यानंतर नाशिकचे महिला आणि पुरुष संघ दिनांक २३ ते २५ ऑक्टोबर, २०२१ दरम्यान कोल्हापूर येथे आयोजित महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होईल अशी माहिती प्रशिक्षक तथा जिल्हा सचिव राजू शिंदे आणि कार्यध्यक्ष उदय खरे यांनी दिली. या स्पर्धा दरम्यान शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन केले जाईल. स्पर्धा स्थळी जास्त गर्दी होणार नाही, तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर करणे याची काळजी घेतली जाईल असेही राज्य शिंदे यांनी सांगितले. तरी नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंनी दिनांक १६ ऑक्टोबर रोजी स्पर्धा स्थळी उपस्थित राहावे असे अवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी मो. क्र ८००७२३०७७४ या क्रमांकावर संपर्क करावा.






