नवीन पिढीच्या खेळाडूंनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन खेळामध्ये प्रावीण्य मिळवून देशाचे नाव उज्वल करावे – दत्त पाटील, संचालक – कालिका देवी मंदिर ट्रस्ट तथा अध्यक्ष नाशिक तलवारबाजी असोसिएशन.
नाशिक :- खाशाबा जाधव यांनी सन १९५२ च्या हेलसिंकी, फिनलंड येथे झालेल्या ऑलीम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये भारताला पाहिले वैयक्तिक पदक मिळवून दिले आहे. खरं तर त्यांची ही कामगिरी फार मोलाची आणि सर्वांना प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्याच्या या कामगिरीची दखल घेऊन नाशिकच्या कालिका देवी मंदिर संस्थान , अखिल भारतीय मराठा महासंघ आणि क्रीडा संस्कृती फौंडेशन यांच्या वतीने मागील चार वर्षीपासून १५ जानेवारी हा खाशाबा जाधव यांचा जन्म दिवस ” महाराष्ट्र क्रीडा दिन” म्हणून साजरा करण्यास सुरवात केली आहे. पहिल्या वर्षी नाशिकमधील ७६ कुस्तीपटूंचा, दुसऱ्या वर्षी नाशिकच्या जेष्ठ खेळाडूंचा सन्मान , तिसऱ्या वर्षी नाशिक जिल्हातील विविध शैक्षणिक संस्था , शाळा, महाविद्यालये यांचे क्रीडा प्रेमी मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांना सन्मानित करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांना स्व. खाशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजीत यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते सन्मान करून हा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला होता.
यावर्षीही नाशिक जिल्यातील पन्नास निवृत्त क्रीडा शिक्षक आणि मुख्याधापक यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र दोन दिवसापूर्वी नाशिकच्या प्रशाशनाकडून करोना संदर्भात नवीन पत्रक जाहीर केल्यामुळे जास्त होणाऱ्या गर्दीचा विचार करून हा सन्मान सोहळा दोन आठवडे पुढे ढकलण्यात आला आहे. परंतु १५ जानेवारी हा दिवस महत्वाचा असल्यामुळे शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून गर्दी न करता केवळ पाच – सहा व्यक्तींच्या वतीने ऑलीम्पिक पदक विजेते सर्व खेळाडूंचे हिरो मा. श्री खाशाबा जाधव यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी कालीका देवी मंदिर ट्रस्टचे संचालक आणि नाशिक फेंसिन्ग असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता पाटील, सामाजिक कार्यकर्ते नितीन सुगंधी, मराठा महासंघ महाराष्ट्र क्रीडा समिती अध्यक्ष छत्रपती पुरस्कार प्राप्त आणि या उपक्रमाची सुरवात करणारे अशोक दुधारे, क्रीडा संघटक आनंद खरे, राम पाटील, राजू शिंदे, उदय खरे, शशांक वझे आदी क्रीडा संघटक उपस्थित होते. यावेळी खाशाबा जाधव यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या या दैदिप्यमान कार्याला सलाम करण्यात आला. यावेळी बोलतांना दत्ता पाटील यांनी सांगितले की, खाशाबा जाधव यांचे क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान आहे. सन १९४८ आणि १९५२ या काळात फारश्या सुविधा नसतांना खाशाबा जाधव यांनी जिद्देने मेहनत करून स्वतःच्या हिमंतीवर भारताला ऑलीम्पिकमध्ये पाहिले वैयक्तिक पदक मिळवून दिले. त्यामुळे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि त्यांच्या या कामगिरीपासून प्रेरणा घेऊन नवीन पिढीच्या तरुण खेळाडूंनी आपली खेळातील वाटचाल केली पाहिजे, खेळामध्ये प्रावीण्य मिळवून देशाचे नाव उज्वल करावे असे सांगितले.
क्रीडा क्षेत्रात हॉकीमध्ये भारताला तीन ऑलीम्पिक मेडल मिळवून देणारे मेजर ध्यानचंद यांच्या योगदानाची दाखल घेऊन भारत सरकारच्या वतीने दिनांक २९ ऑगस्ट रोजी त्यांचा जन्म दिवस ” राष्ट्रीय क्रीडा दिन ” म्हणून साजरा केला जातो. त्याचप्रमाणे खाशाबा जाधव यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान लक्षात घेता त्यांच्या कामगिरीची सर्वाना जाणीव व्हावी. तसेच त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्राच्या नवीन पिढीच्या खेळाडूंनी आपल्या खेळांमध्ये प्रावीण्य मिळवावे आणि महाराष्ट्राचे आणि भारताचे नाव उज्वल करावे यासाठी खाशाबा जाधव यांचा जन्म दिवस महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरा करावा यासाठी गेल्या पाच वर्षांपासून नाशिकच्या क्रीडा संघटकांनी या उपक्रमाची नाशिक पासून सुरवात केली आहे. तसेच महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातही अश्याच प्रकारे महाराष्ट्र क्रीडा दिन साजरा करावा यासाठी विविध जिल्ह्यांच्या क्रीडा संघटकांशी संपर्क साधून तेथेही याची सुरवात केली होती. तसेच हा क्रीडा दिन साजरा करावा या संदर्भात सरकार दरबारी विविध निवेदने सादर केली होती. तसेच महाराष्ट्राच्या क्रीडा मंत्री नामदार अदिती तटकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यांनीही निवेदन देऊन हा दिवस महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरा करावा अशी मागणी केली होती. याचे फलित म्हणून तीन दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारचे उप मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलीम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नामदार मा. श्री. अजितदादा पवार यांनी खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस हा ” महाराष्ट्र क्रीडा दिन ” म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येईल आणि या निमित्ताने विविध उपक्रम राबवले जातील अशी घोषणा केली आहे. त्याबद्दल सर्वानी त्यांचे शतशः अभिनंदन आणि आभार मानले. यापुढे महाराष्ट्र शासनाच्या सूचनेप्रमाणे आणि आदेशाप्रमाणे हा महाराष्ट्र दिन दरवर्षी आणखी मोठया उत्साहात साजरा केला जाईल असेही यावेळी ठरविण्यात आले.






