पेयर्समध्ये गोपिनाथ मन्ना आणि तुषार बेदी विजेते.
ब्रीज फेडेरेशन ऑफ इंडियाच्या अधिपत्याखाली, तेलंगणा स्टेट ब्रीज असोसिएशनच्या वतीने हैद्राबाद येथील ज्युबिली हिल्स इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित ज्युबिली हिल्स नॅशनल ब्रीज चैंपियनशिप स्पर्धेच्या स्विस लीग प्रकारात खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत मुंबई – नाशिकच्या “डेझलर्स” संघाने नागपूरच्या “प्ले वेल” संघाचा पराभव करून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. डेझलर्स संघात नाशिकचे हेमंत पांडे आणि सूर्या रेड्डी आणि मुंबईच्या रोहित मिश्रा व डॉ. उल्हास शिरोडकर या चार खेळाडूंचा समावेश होता. अंतिम लढतीत हेमंत पांडे , सूर्या रेड्डी आणि रोहित मिश्रा, डॉ. उल्हास शिरोडकर यांनी आपल्या बुद्धीचा सुंदर वापर करून आपल्या संघाला विजयी करण्यात महत्वाची भूमिका पार पडली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत डेझलर्स संघाकडून खेळतांना हेमंत पांडे , सूर्या रेडडी, रोहित मिश्रा आणि डॉ. उल्हास शिरोडकर यांनी आपल्या संघासाठी अगदी सय्यमने खेळ करून पहिल्या फेरीपासून गुणांची आघाडी मिळविली. आणि चार फेऱ्यांनंतर एकूण ७० गुण मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. तर प्ले वेल संघाच्या पी श्रीधर, आकांशा व्यास , राज मोहन आणि टी . व्ही . रामाणी यांनी आपापसात चांगला समन्वय साधून खेळ केला आणि चांगली लढत दिली. मात्र या अंतिम लढतीत प्ले वेल संघाला ६४ गुण कमावता आले. या सहा गुणांच्या पिछाडीमुळे त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.या स्पर्धेत सहभागी झालेल्या ४४ संघादरम्यान पहिल्या दिवशी स्विस लीगचे राऊंड खेळविले गेले. तर रविवार ७ जुलै रोजी उपउपांत्य सामने खेळविण्यात आले, आणि त्यानंतर सोमवार दिनांक ८ जुलै रोजी दोन उपांत्य सामने आणि त्यानंतर अंतिम सामना पार पडला.
पेयर्समध्ये गोपिनाथ मन्ना आणि तुषार बेदी विजयी – पेयर्स विभागात मुंबईच्या गोपिनाथ मन्ना आणि तुषार बेदी या जोडीने अंतिम लढतीत जग्गी शिवदासानी आणि संदीप ठकराल या जोडीचा पराभव करून विजेतेपद मिळविले. या स्पर्धेत स्विस लीग प्रकारात ४४ संघानी आणि पेयर्स विभागात एकूण ८४ पेयर्सनी सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला. या स्पर्धेतील विजेत्यांना आयोजकांच्या वतीने पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे प्रमुख म्हणून एम. बी. व्ही. सुब्रह्मण्यम, जे. गोविंद राव, ए. सुरेश यांनी चांगल्याप्रकारे आपली जबाबदारी पार पडली. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ . धर्मा रेड्डी, सी.व्ही. दुर्गा प्रसाद, ए. सुरेश रेडडी, यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहकाऱ्यानी परिश्रम घेतले.
स्पर्धेचा निकाल :- स्विस लीग नॅशनल ब्रीज चैंपियनशिप
१) विजेता संघ – “डेझलर्स ” संघ (हेमंत पांडे, सूर्या रेडडी. रोहित मिश्रा आणि डॉ. उल्हास शिरोडकर )
२) उपविजेता संघ – ” प्ले वेल” संघ (आर. एन. बसूरी, लक्ष्मण नारायण, अमित रेवतकर आणि आर. रेवतकर)
मॅच पॉईंट पेयर्स नॅशनल ब्रीज चैंपियनशिप
१)विजेती जोडी – गोपिनाथ मन्ना आणि तुषार बेदी
२) उपविजेती जोडी – जग्गी शिवदासानी आणि संदीप ठकराल






