महिलांमध्ये कर्करोगाची जागरूकता हाच सर्वोत्तम उपाय – डॉ. प्रणिता हर्षद संघवी

Feb 1, 2022

जागतिक कर्करोग जागरूकता विशेष : स्त्रियांमध्ये प्रामुख्याने स्तनाचा, गर्भाशय मुखाचा, गर्भाशय पिशवीचा, बीजकोशाचा कर्करोग जास्त आढळतो. त्यामुळे आजाराची लक्षणे जाणून घेणे व वेळीच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप आवश्यक आहे.

कॅन्सर ( कर्करोग ) ही एक जीवघेणी समस्या आहे. भारतात दरवर्षी जवळपास सात लाख महिलांना कर्करोगाचा प्रादुर्भाव होतो. सगळ्यात भयावह गोष्ट म्हणजे कर्करोग हा शरीरात असूनही, अज्ञानामुळे लक्षात येत नाही कर्करोगाचे निदान हे उशीरा झाल्यामुळे दरवर्षी हजारो स्त्रिया मृत्युमुखी पावतात, जवळपास 60 टक्के कर्करोगाचे निदान हे शेवटच्या स्टेजमध्ये होते. कर्करोगाची लक्षणे लवकर ओळखण्यासाठी स्त्रियांमध्ये जागरूकतेची फार मोठी गरज आहे

स्तनांचा कर्करोग : स्तनांत दुग्धग्रंथिमध्ये आढळणारा कर्करोग हा स्त्रियांमध्ये होणाऱ्या कोणत्याही विकारा पैकी सर्वात गंभीर असा विकार आहे. याचे प्रमाण तीस वर्षानंतरच्या स्त्रियांमध्ये, मुलांना स्तनपान न करणाऱ्या स्त्रियांमध्ये, रजोनिवृत्ती झालेल्या तसेच, अविवाहित स्त्रियांमध्ये अधिक आहे. स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका अंदाजे नऊपैकी एका स्त्रीला असतो, बहुतांश वेळी असं निदर्शनास आलं आहे की, महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग झाल्याचं निदान हे फार उशिरा होते. आज भारतीय स्त्रियांना होणाऱ्या कर्करोगाच्या प्रकारांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वात जास्त आहे. प्रारंभिक अवस्थेत याचे निदान झाल्यास अनेक कष्टदायक त्रासातून मुक्तता मिळते. यासाठी वयाच्या तिशीनंतर स्तनाची नियमित वर्षातून किमान एकदा स्त्री रोग तज्ञांकडून तपासणी करून घेणे गरजेचे आहे. याशिवाय स्वतः स्तन परीक्षण करून स्तनाच्या ठिकाणी गाठ किंवा असामान्य वृद्धि नसल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. स्वतः तपासणी केल्यानंतर जर स्तनांमध्ये असामान्य वृत्ती गाठ स्पर्शात जाणवल्यास तात्काळ स्त्रीरोग तज्ञांशी संपर्क साधावा, जेणेकरून कर्करोगाचे वेळीच निदान होईल आणि प्राथमिक अवस्थेतच कर्करोगाला थांबवता येईल.

नवतरुणी मध्ये स्तन कर्करोगाचे वाढते प्रमाण : पन्नाशीनंतर होणाऱ्या, या कर्करोगाचे प्रमाण आज 20 ते 35 वयोगटातील तरुणींमध्ये प्रचंड वाढत असल्याचे आढळून आले आहे. बदलती जीवनशैली, असंतुलित आहार, आरोग्याकडे दुर्लक्ष आणि कामाचा अतिरिक्त ताण यामुळे तरुणींमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक तरुण स्त्रीला हा धोका असतोच ,परंतु यापूर्वीच म्हणजेच गेल्या दशकात 50 व 55 पेक्षा अधिक वय असलेल्या प्रौढ महिलांमध्ये हा कर्करोग आढळणे सामान्य बाब होती, मात्र आता त्या वयाचा आलेख आता अवघा 30 ते 35 वय वर्ष इतका घसरला आहे, वयाच्या 25 नंतर प्रत्येक स्त्रीला याचा धोका असतो. महिलांचे वय वाढते तसा धोकाही वाढत असतो. विशेषता: ज्या स्त्रिया प्रस्तुती नंतर आपल्या बाळाला स्तनपान करत नाहीत, त्यांना स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे प्रसूतीनंतर स्त्रियांसाठी स्तनपान करणे अत्यंत गरजेचे असते.

 

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे : स्तनाच्या कर्करोगची सुरुवात दुग्धग्रंथीतून निघणाऱ्या वाहीकांमधून होतो. सुरुवातीला स्तनाच्या ठिकाणी एक पीडा रहित गाठ/ पिंड उत्पन्न होते.
• स्तनात पिडा रहित गाठ किंवा पिंड असणे.• अचानक स्तनाचा आकार वाढणे स्तन घट्ट होणे, स्तन आकुंचन पावणे.• स्तनाग्रातुन द्राव येणे, आत वळलेले स्तनाग्रे , स्तनाग्र लाल होऊन वेदना होणे. • स्नायूंच्या वेदना, पाठ दुखी, दुर्बलता ही लक्षणे तरुणींच्या कर्करोग मध्ये जाणवू शकतात.

स्तनाच्या कर्करोगाची कारणे आणि कशामुळे होतो. • स्तनाच्या कर्करोगाला कौटुंबिक इतिहास असतो. कुटुंबातील आई, बहिणींमध्ये जर स्तनाचा कर्करोग असल्यास, अनुवंशिक कारणात मुळे स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी कुटुंबातील व्यक्तींमध्ये स्तन कर्करोगाची लक्षणे जाणवले तर खबरदारी म्हणून स्वतः देखील स्तन परीक्षण करून घेणे आवश्यक असते.
• वयाच्या १२व्या वर्षापूर्वीच मासिक पाळी सुरू झालेली असल्यास. • वयाच्या ५५ व्या वर्षानंतर रजोनिवृत्ती झाल्यास. • प्रथम आपत्य जर वयाच्या तीस वर्षानंतर झाल्यास. • कुटुंब नियोजन औषधांच्या अतिरेकामुळे. • आपल्या बाळा स्तनपान न करणाऱ्या महिला. • व्यसनाधीनतेमुळे जसे तंबाखू मद्यपान इत्यादी. • लठ्ठपणा असणाऱ्या महिला अधिक चरबी युक्त, स्नेह युक्त आहाराचे सेवन करणाऱ्या स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते.• पूर्वी गर्भाशयाचा किंवा कोलोनचा कर्करोग झालेल्या स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचा अधिक धोका असतो. गर्भाशयाचा कर्करोग स्तनाचा कर्करोग याचा जवळचा संबंध असतो.

स्तनाचा कर्करोग वैद्यकीय निदान व चाचणी परीक्षण : मेमोग्राफी टेस्ट स्तन कर्करोगाचे निदान करण्यासाठी मॅमोग्राफी द्वारे स्क्रिनिंग परीक्षण केले जाते. क्ष-किरण परीक्षणांसारखेच मॅमोग्राफी ची चाचणी असून तीस मिनिटांमध्ये चाचणी पूर्ण होते, तसेच चाचणी करतेवेळी कोणताही त्रास रुग्णाला होत नाही. या चाचणीतून उपस्थित गाठ ही कर्करोगाची आहे की नाही याचे निदान होण्यास मदत होते. वेळोवेळी स्तनामध्ये गाठ नसल्याची खात्री करून घेणे गरजेचे असते, यासाठी वयाच्या पस्तिशीनंतर दरवर्षी नियमित मॅमोग्राफी चाचणी करून घ्यावी, याद्वारे कर्करोगाचे निदान होण्यास मदत होते, स्तनाचा कर्करोग हा असा आजार आहे की ज्याचे जितक्या लवकर निदान होईल तितक्या लवकर यावर उपाय करणे शक्य होते , ३५ वयाच्या वरील स्त्रियांमध्ये मॅमोग्राफी करणे आवश्यक आहे. मात्र अनेक महिला माहितीच्या अभावामुळे ही चाचणी करणे टाळतात, संशयीत गाठी असल्यास बायोप्सी सुद्धा केली जाते.

महिलांनी स्तनाचा कर्करोग होऊ नये म्हणून कुठली काळजी घ्यावी

• वयाच्या पस्तिशीनंतर वर्षातून एकदा मेमोग्राफी टेस्ट करणे.

• महिन्यातून एकदा स्तनांची स्वतः तपासणी करणे स्वतः स्तन परीक्षण करून स्तनाच्या ठिकाणी गाठ आहे का ? हे पहावे.

• स्रि रोग तज्ञाकडून वयाच्या तिशीनंतर नियमित वार्षिक तपासणी करून घ्यावी. तर तीस वर्षाच्या आतील स्त्रियांनी किमान दोन वर्षाआड तज्ञांकडून तपासणी करून घ्यावी.
• कुटुंबातील आई बहिणींमध्ये जर स्तन कर्करोगाची लक्षणे उद्भवल्यास स्वतः सुद्धा स्तन कर्करोगाचे निदान करून घ्यावे.

• अधिक चरबी युक्त, स्नेह युक्त आहार सेवन करणे टाळावे, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध फळे याचा आहारात अधिक समावेश करावा.

• नियमित व्यायाम योगासने करावेत.

• मानसिक ताण-तणावापासून मुक्त राहावे.

स्तनाचा कर्करोग आणि उपचार : स्तनाच्या कर्करोगावर उपचार हे कर्करोगाच्या अवस्थेवर , कर्करोग किती पसरला आहे यावर अवलंबून आहे. स्तन कर्करोगावर खालील उपचाराद्वारे मात केली जाते.
• केमोथेरेपी ( Chemotherapy).

• मेस्ट्रोकटॉमी सर्जरी (Mastectomy Surgery).

• किरणोत्सार ( Radiation Therapy) यासारख्या उपायांचा चिकित्सेमध्ये अवलंब केला जातो. स्तनाच्या कर्करोगाचा उपचार करताना स्तनातील गाठ आणि त्या भोवतालची उती किरणोत्सार ( Radiation ) किंवा त्याविना काढतात तसेच काही वेळेस संपूर्ण स्तन काढून टाकला जातो.

गर्भाशय मुखचा कर्करोग : गर्भाशय मुखाचा कर्करोग म्हणजेच सर्वाइकल कॅन्सर हा गर्भाशया मधील सर्विक्स या अवयवात होणारा कर्करोग आहे. सर्विक्स म्हणजे गर्भपिशवी आणि योनीला जोडणारा अवयव, तर अशा या सर्विक्सच्या पेशीमध्ये होणारा कर्करोग म्हणजे गर्भाशय मुखाचा कर्करोग होय. इतर कर्करोग प्रमाणेच सुरुवातीला या कर्करोगाची काहीच लक्षणे दिसत नाहीत. स्त्रियांमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाने मृत्यू होण्याचे प्रमाण हे इतर कर्करोगा पेक्षा जास्त आहे. स्त्रियांमध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्या कर्करोगाच्या यादीमध्ये याचा क्रमांक स्तनाच्या कर्करोगाचे नंतर लागतो. 35 ते 55 वयांच्या महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे सर्वाइकल कर्करोग हा प्रामुख्याने ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) या विषाणूंचा इन्फेक्शन मुळे होतो. आज गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण धोकादायक पातळीवर पोहोचल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यासाठी 21 ते 55 वयोगटातील महिलांनी दोन ते तीन वर्षातून एकदा तरी आपली तपासणी करून घेणे गरजेचे आहे, हा सामान्यता धीम्या गतीने वाढणारा कर्करोग आहे. ज्याची लक्षणे दिसतातच असं नाही पण नियमित पॅप स्मिअर चाचणीने याचे निदान करता येऊ शकते व वेळीच या दुज्जर आजारांपासून बचाव करता येतो.

 

गर्भाशय मुखाच्या कर्करोग होण्याची कारणे

•धुम्रपान करणाऱ्या महिला.

गुप्तांगाची अस्वच्छता.

• एचपीव्ही ( HPV) चा प्रादुर्भाव.

• शारीरिक संबंध कमी वयात होणे

• एका पेक्षा जास्त व्यक्तीशी शारीरिक संबंध असणे.

• वारंवार गर्भधारणा व गर्भपात होणे

• गर्भनिरोधक गोळ्या जास्त वर्ष घेणे
• प्रतिकारशक्ती कमी असणे

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची लक्षणे : गर्भाशय मुखाचा कर्करोग हा सामान्यता धीम्या गतीने वाढणारा कर्करोग आहे. ज्याची लक्षणे दिसतातच असं नाही. पण सर्वाधिक प्रमुख लक्षणे म्हणजे योनीमार्गातून अस्वाभाविक रित्या रक्तस्राव होणे. पण काही रुग्णांमध्ये प्रगत टप्प्यापर्यंत कर्करोग होईपर्यंत कदाचित सुस्पष्ट अशी कोणतीच लक्षणे दिसून येणार नाहीत. नंतर तुम्हाला कदाचित ओटीपोटाच्या वेदना किंवा योनीमार्गातून रक्तस्राव होऊ शकतो.
•योनीतून अस्वाभाविक रीत्या रक्तस्राव होणे खूप जास्त रक्तस्राव होणे.

• गर्भाशयातील विकृती युक्त स्त्राव योनीतून येणे.
• लैंगिक संबंधानंतर किंवा तपासणी केल्यावर रक्तस्राव होणे.

• रजोनिवृत्ती नंतर ही रक्तस्राव होणे.

• याशिवाय भूक कमी होणे ओटीपोटात दुखणे वजन कमी होणे कंबर पाय दुखणे यासारखी लक्षणे जाणू शकतात.

Pap Smear किंवा Pap Test म्हणजे काय ? : यामध्ये सर्विक्स मधून पेशी गोळा करून सूक्ष्मदर्शकाखाली त्याची तपासणी केली जाते. गर्भाशयाच्या पेशीमध्ये झालेली अस्वाभाविक बदल यामुळे दिसून येतात, आणि भविष्यात गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्याची शक्यता आहे की नाही हे कळण्यास यामुळे मदत होते. गर्भाशय मुखाचा कर्करोग प्रतिबंध करण्यासाठी पॅप टेस्ट नियमित करणे गरजेचे आहे. यासाठी वयाच्या २१-६५ वर्षानंतरच्या प्रत्येक महिलेने तीन वर्षातून एकदा तरी पॅप टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. या चाचणीमध्ये कर्करोगाचा संशय आल्यास कॉलेनोस्कोपी करून बायोप्सी घेतली जाते

गर्भाशय मुखाचा कर्करोग आणि उपचार : या उपचार पद्धती मध्ये सर्जरी रेडिएशन थेरपी ,कीमोथेरेपी किंवा यांच्या एकत्रीकरणाचा समावेश असू शकतो. उपचार पद्धती ही रोगाच्या गाठीच्या आकारावर कॅन्सरच्या स्टेज वर आणि किती प्रमाणात पसरला आहे .यावर अवलंबून असते कर्करोग जर पहिल्या स्टेजमध्ये असेल तर छोट्या सर्जरी करून उपचार केले जातात. तेव्हा गर्भाशय पिशवी काढून टाकणे योनिमार्गाचा वरचा भाग काढणे किंवा शस्त्रक्रियेने आजूबाजूचे अस्तर काढले जाते.कर्करोगाचे प्रमाण जास्त असल्यास रेडिएशन थेरपी, किमोथेरपी चा पर्याय निवडला जातो.

गर्भाशयाचा कर्करोग : भारतात सुमारे दरवर्षी 13 हजार महिला गर्भाशयाच्या कर्करोगामुळे मृत्यू पावतात गर्भाशयाच्या आतल्या अस्तराचा कर्करोग 50 ते 65 या वयात होऊ शकतो

गर्भाशयाचा कर्करोग होण्याची कारणे
• स्त्रियांमध्ये मधुमेह रक्तदाब व स्थुलता असणे
• उशिरा लग्न होणे वा कुमारीका असणे
• मुलं न होणे किंवा उशिरा होणे
•अति स्थूलपणा
• मासिक पाळीतील अनियमितता, हार्मोन्समधील असंतुलनामुळे

गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे
•पाळी जास्त दिवस येणे

• जास्त रक्तस्राव होणे

• पाळी लवकर लवकर येणे

• अनियमित रक्तस्राव होणे

• रजोनिवृत्तीनंतर रक्तस्राव होणे

वरील प्रमाणे काही लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा कर्करोगाचे निदान करण्यासाठी सोनोग्राफी केली जाते यामध्ये गर्भाशयातील अस्तराची जाडी जास्त असेल तर गर्भाशयाच्या पोकळीची दुर्बिणीने तपासणी केली जाते (हिस्ट्रॉस्कॉपी) व आवरणाची बायोप्सी करून कर्करोगाचे निदान केले जाते दुर्दैवाने अनेक स्त्रिया ह्या आहे हा धोकादायक लक्षणांकडे रजोनिवृत्तीची लक्षणे समजून दुर्लक्ष करतात व कर्करोगाचे निदान लवकर होत नाही

गर्भाशय मुखाचा व गर्भाशयाचा कर्करोगापासून बचाव कसा करावा आणि कोणती काळजी घ्यावी.

• वजन आटोक्‍यात ठेवावे नियमित व्यायाम करावा.

• चरबी युक्त, स्नेह युक्त अधिक आहार सेवन करणे टाळावे.

• उच्च रक्तदाब मधुमेहासारखे विकार असल्यास त्यावर उपचार घ्यावा.

• गर्भाशय मुखाच्या कर्करोगास प्रतिबंध करण्यासाठी पॅप
टेस्ट नियमित करणे गरजेचे आहे. वयाच्या २१ ते ६५ वर्षानंतरच्या प्रत्येक तीन वर्षातून एकदा तरी पॅप टेस्ट करून घेणे गरजेचे आहे.

• रजोनिवृत्तीनंतर जर विकृती जन्य योनी स्त्राव येत असल्यास तात्काळ स्त्रीरोग तज्ञांशी संपर्क साधावा.

• कुटुंबातील आई-बहिण यामध्ये जर गर्भाशयाचा कर्करोगाची लक्षणे उद्भवल्यास स्वतः सुद्धा गर्भाशयाचा कॅन्सरचे निदान करून घ्यावे

अजूनही भारतातील महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. अज्ञान व लाज यामुळे डॉक्टरांकडे जाण्याची टाळाटाळ करतात.अति झाल्यावरच तपासणी करतात तोपर्यंत कर्करोग हा शेवटच्या स्टेजला पोहोचू शकतो. पण हा कर्करोग प्राथमिक अवस्थेत ओळख आला तर तो पूर्ण बरा होऊ शकतो. नियमित व्यायाम सकस आहार निरोगी जीवनशैली व कर्करोगाबद्दल ची जागृकता यामुळेच आपण या जीवघेण्या आजारावर मात करू शकतो.

डॉ. प्रणिता हर्षद संघवी.
स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ.
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल नाशिक.
मो. 9403450179

अजून बातम्या वाचा..

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमधील शस्‍त्रक्रियेने बांग्‍लादेशी युवकाला जीवनदान

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमधील शस्‍त्रक्रियेने बांग्‍लादेशी युवकाला जीवनदान

नाशिकः कर्करोग उपचारात आंतरराष्ट्रीय स्‍तरावर नावलौकिक मिळविलेल्‍या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरने...

read more
किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये “नॉर्मोथर्मिक मॅन्युअल पर्फ्युजन” (NMP) तंत्राने किडनी प्रत्यारोपण

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये “नॉर्मोथर्मिक मॅन्युअल पर्फ्युजन” (NMP) तंत्राने किडनी प्रत्यारोपण

नाशिक : किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक येथे किडनी प्रत्यारोपण क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण वैद्यकीय...

read more
अत्याधुनिक मिसो रोबोटिक तंत्रज्ञानव्दारे जॉइंट रिप्लेसमेंट करणे झाले आणखी सोपे ;किम्स मनवता हॉस्पिटलमध्ये सिस्टीमचा शुभारंभ

अत्याधुनिक मिसो रोबोटिक तंत्रज्ञानव्दारे जॉइंट रिप्लेसमेंट करणे झाले आणखी सोपे ;किम्स मनवता हॉस्पिटलमध्ये सिस्टीमचा शुभारंभ

नाशिक : किम्स मनवता हॉस्पिटल, नाशिकने प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा...

read more
Breaking News