दोषविरहित मतदार यादी तयार करण्याची कार्यवाही लवकरच
नाशिक : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या पूर्वतयारीसाठी जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्ह्यातील शालेय, माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत पालकांना प्रश्न मंजूषाद्वारे निवडणूकीबाबत मतदार यादी, विधानसभा मतदारसंघ, नावातील बदल, नव मतदाराचा मतदार यादीत समावेश तसेच मृत व्यक्तीचे नांव यादीतून वगळणे अशा स्वरुपाचे प्रश्न असणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या “मतदार जागृती आणि जिल्हा सुलभ निवडणुका व्यवस्थापन समितीच्या” बैठकीत ते बोलत होते. यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्राची वाजे, महानगरपालिका शिक्षणाधिकारी देविदास महाजन अग्रणी बँक अधिकारी भरत बर्वे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुरेखा पाटील, व विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्री. मांढरे म्हणाले, नाशिक जिल्हयामध्ये प्राथमिक, माध्यमिक विद्यालये आणि महाविद्यालयांमध्ये साधारणत: सहा ते सात लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जिल्हयातील साधारण पंचवीस लाख मतदारांपर्यंत पोहोचणे जिल्हा निवडणूक प्रशासनास शक्य होणार आहे. त्यासोबतच नगरपालिका, सहकारी संस्था, विविध बँका, अंगणवाडी यांच्या माध्यमातूनही जिल्ह्यातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचून जिल्ह्यातील मयत मतदारांची नांवे वगळण्याची मोहीम हाती घेण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व दिव्यांग मतदारांचा शोध घेणे व दिव्यांग मतदारांची नोंदणी मतदार यादीमध्ये करून सर्व दिव्यांग मतदारांना आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सुलभ पद्धतीने मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे. मतदार यादीचे शुद्धीकरण व दोषविरहित मतदार यादी तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून “नाम में क्या रखा है?” हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री.मांढरे यांनी सांगितले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा हक्क कर्तव्य म्हणून बजावून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुरज मांढरे यांनी केले.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी सादरीकरणाद्वारे स्वीप समितीच्या कामाकाजाची माहिती दिली. बैठकीच्या शेवटी निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार डॉ.अमित पवार यांनी आभार मानले.




