नाशिक :- प्रोग्रेसीव्ह एज्युकेशन संस्थेच्या नाशिक रोड, नारायण बापू नगर जवळील ब्लू बेल शाळेच्या विदयार्थी प्रतिनिधींचा पदग्रहण सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार क्रीडा पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक आनंद खरे, केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापिका राजश्री गांगुर्डे उपस्थित होते. शाळेच्या मुख्याधिपिका श्रीमती अदिती बॅनर्जी आणि उपमुख्याधिपिका मनीषा सावरखेडकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी शाळेच्याविद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. या कार्यक्रम प्रसंगी ज्या विद्यार्थ्यांची विविध पदावर निवड करण्यात आली अश्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदाचे बॅचेस देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी विदयार्थी प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले. आमच्यावर दिलेली जबाबदारीची जाणीव ठेवून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडू असे त्यांनी सांगितले.
यावेळी आनंद खरे आणि श्रीमती राजश्री गांगुर्डे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आनंद खरे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर आपल्यामध्ये असलेल्या कलागुणांनाही जोपासावे. आपण शिक्षण आणि आपले आवडीचे कलागुण (खेळ, सांस्कृतिक इ.) यामध्ये योग्य समन्वय साधल्यास दोन्हीमध्ये आपल्याला चांगली प्रगती साधता येईल आणि ही काळाची गरज आहे असे सांगितले.
तर श्रीमती राजश्री गांगुर्डे यांनी सांगितले की आपल्याला दिलेल्या पदाचे कौतुक आहेच, परंतु त्याचबरोबर आपल्यावर दिलेली जबाबदारी आपण योग्य प्रकारे पार पडली तर खऱ्या अर्थाने याचे सार्थक होईल असे सांगून ब्लू बेल शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी प्रोग्रेसीव्ह एज्युकेशन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीही पद ग्रहण केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे पालक मोठया संख्येने उपस्थित होते.






