नाशिक – साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी शहरातील संवेदनशील व ग्रामीण भागात जनजागृती करावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
महानगरपालिका येथील स्थायी समिती सभागृहात आयोजित साथीच्या रोगाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, आरोग्य सहसंचालक डॉ. सतिश पवार, संचालक डॉ.अर्चना पाटील, उपसंचालक (आरोग्य) डॉ.रत्ना रावखंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, आदी उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले, स्वाईन फ्ल्युबाबत प्रत्येक नागरिकाने आपल्या स्तरावर काळजी घेणे आवश्यक आहे. सर्दी ,खोकला आणि तापाची लक्षणे 24 तासापेक्षा जास्त काळ राहिल्यास स्वाईन फ्ल्यु प्रतिबंधक औषधोपचार सुरु करावेत. खासगी रुग्णालयांनी व वैद्यकीय महाविद्यालयांनी तात्काळ उपचारासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. डेंग्यू या साथीच्या रोगाला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहिम राबवावी.
केंद्राच्या धर्तीवर सुरु करण्यात आलेला ‘आपला दवाखाना’ नाशिकमधेही लवकर सुरु करण्यात येणार असून रिक्त असलेली आरोग्य विभागाची पदेही लवकर भरण्यात येतील असे त्यांनी यावेळी सांगितले. बैठकीत रुग्णांचे सर्वेक्षण, निदान, उपचार, आरोग्य शिक्षण, प्रशिक्षण इत्यादी बाबीकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. प्रत्येक आरोग्य केंद्रात स्वाईन फ्ल्यूसाठी लागणाऱ्या औषधांचा व नाशिक शहर व ग्रामीण भागातील डेंग्यू परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. डेंग्यू व स्वाईन फ्ल्यु संदर्भातील मार्गदर्शक सूचना सर्व शासकीय व खासगी रुग्णालयात ठळकपणे प्रदर्शित करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...






