नाशिक : नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि केन्सिंग्टन क्लब यांच्या वतीने आयोजित ३ ऱ्या बॅडमिंटन लीग स्पर्धेत नाशिक सुपर किंग आणि निवेक यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात नाशिक सुपर किंगच्या संघाने ३-३ अश्या बरोबरीनंतर शेवटच्या निर्णायक सामन्यात २-१ असा विजय मिळवून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तर केवळ काही गुणांच्या फरकाने निवेक संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तब्बल पाच तास चाललेल्या या अंतिम फेरीच्या सामन्यात बरेच चढ-उतार बघायला मिळाले.
या सामन्यातील पुरुषांच्या पहील्या लढतीत निवेकच्या हर्षल टेंभूरणीकर आणि विनायक दंडवते या जोडीने नाशिक सुपर किंग संघांच्या प्रसाद शिवदे आणि तेजस सोमण यांचा २१-१२, २१-११ असा पराभव करून निवेक संघाला एक गुण मिळवून देत चांगली सुरवात केली. तर पुरुषांच्या दुसऱ्या सामन्यात नाशिक सुपर किंगच्या विक्रांत करांजकर आणि अदित गुप्ता यांनी निवेकच्या सिद्धार्थ वाघ आणि रोहित पाटील यांचा २१-०८, २१-१२ असा सहज पराभव करून आपल्या संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर खेळल्या गेलेल्या मुलांच्या १८ वर्षे गटाच्या सामन्यात खरी चुरस बघायला मिळाली. ३५ मिनिटे चाललेल्या या सामन्यात निवेककडून खेळणाऱ्या राष्ट्रीय खेळाडू पार्थ देवरे आणि तन्मय राव आणि नाशिक सुपर किंग संघाच्या कृष्णा मजेठीया आणि ओम अमृतकर यांच्यात झालेल्या सामन्यात पहिला सेट पार्थ आणि तन्मय यांनी २१-१५ असा जिंकून १-० अशी आघाडी मिळवली. तर दुसऱ्या सेटमध्ये नाशिक सुपर किंगच्या कृष्णा मजेठीया आणि ओम अमृतकर यांनी चांगली लढत देत २०-२० अशी गुणांची बरोबरी केली. त्यानंतरं मात्र यश आणि तन्मय यांनी सयायीमणे खेळ करून हा सेट २४-२२ असा जिंकून हा सामना ही आपल्या नांवे करून निवेक संघाला पुनः २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर खेळल्या गेलेल्या मिश्र दुहेरीमध्ये मात्र नाशिक सुपर किंगच्या मनोज महाजन आणि पायल जैन या जोडीने निवेक संघाच्या स्वप्नील भामरे आणि निकिता नगराळे यांच्यावर २१-१२ आणि २१-०६ असा एकतर्फी विजय मिळवून पुनः नाशिक सुपर किंग संघाला २-२ अशी बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर खेळल्या गेलेल्या ९५ वर्षावरील गटाच्या सामन्यात निवेक संघाच्या डॉ. शिरीष घन आणि धिरेन तीलवाणी यांनी सुंदर खेळ करून नाशिक सुपर किंगच्या दिपक सोमण आणि संभाजी पाटील यांना २१-१२ आणि २१-१६ असे पराभूत करून निवेक संघाला पुनः ३-२ अशी आघाडी मिळवून देण्यात महत्वाची भूमिका पार पडली. त्यानंतर ७५ वर्षे वयोगटामध्ये नाशिक सुपर किंगच्या विक्रांत उगले आणि नीरज पटकी आणि निवेकच्या प्रशांत दुधेडीया आणि अद्वैत संगपाळ यांच्यात खेळल्या गेलेल्या सहाव्या सामन्यात विजयासाठी चांगलाच संघर्ष बघायला मिळाला. यामध्ये पहिल्या सेटमध्ये २०-२० अश्या बरोबरीनंतर विक्रांत उगले आणि नीरज पटकी यांनी शेवटच्या गुणांसाठी चांगले प्रयत्न करून हा सेट २३-२१ असा जिंकून आघाडी घेतली, तर दुसऱ्या सेटमध्येही असाच संघर्ष दिसून आला. या सेटमध्येही २०-२० अश्या बरोबरीनंतर पुनः नाशिक सुपर किंगच्या जोडीने आपआपसात चांगला समन्वय साधून हा सेटही २२-२० असा जिंकून आपल्या नाशिक सुपर किंग संघाला ३-३ अशी बरोबरी मिळवून दिली.
त्यामुळे ३-३ अश्या बरोबरी नंतर आता शेवटच्या निर्णायक सामन्यात कोण बाजी मारणार यासाठी सर्वांना उत्सुकता लागून गेली. नाशिक सुपर किंगच्या मुकेश पवार, विशाल करंजकर विरुद्ध निवेकच्या सुंदर राजन, नितीन वागस्कर यांच्यात खेळल्या गेलेल्या या ८५ वर्षे गटाच्या शेवटच्या निर्णायक सामन्यात सर्वात जास्त चुरस दिसून आली. या सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये निवेकच्या जोडीने हा सेट २१-१५ असा जिंकून १-० अशी आघाडी मिळवत चांगली सुरवात केली. त्यानंतर मात्र नाशिक सुपर किंगच्या जोडीने जिद्दने खेळ करून ८-४ अशी आघाडी घेतली, आणि हीच आघाडी कायम राखून हा दूसरा सेट २१-१८ असा जिंकून १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर तीसऱ्या निर्णायक सेटमध्येही मुकेश पवार आणि विशाल करंजकर यांनी हीच लय कायम राखून हा सेट २१- १३ असा जिंकून ४-३ फरकाने आपल्या नाशिक सुपर किंग संघाला या ३ ऱ्या बॅडमिंटन लीग चे विजेतेपद मिळवून दिले.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण नाशिक बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम मुंदडा यांच्या हस्ते पर पडले या स्पर्धेतील विजेत्या संघांना आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी या स्पर्धेचे आयोजक जिल्हा सचिव योगेश एकबोटे, पराग एखांडे, मिलिंद जोशी, समीर रहाळकर आदी उपस्थित होते.
तब्बल पाच तास चाललेल्या या अंतिम फेरीसाठी आणि संपूर्ण स्पर्धेच्या वेळी नाशिकच्या बॅडमिंटन खेळाडू आणि क्रीडा प्रेमीनी उपस्थित राहून खेळाडूंचा आणि आयोजकांचा उत्साह द्विगुणित केला.






