इच्छुक संघांनी आज 28 जून रोजी ऑनलाईन पद्धतीने करावी नोंदणी : राजेश बागुल
नाशिक: :शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत ०६ जुलै 2022 पासुन जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी घेवु इच्छिणाऱ्या सर्व संघांनी आज २८ जुन २०२२ रोजी ऑनलाईन पद्धतीने संघाची नोंदणी करावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागुल यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने कोविड – १९ च्या कालखंडानंतर प्रथमच सन २०२२ – २३ या वर्षासाठी जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होवु इच्छिणाऱ्या सर्व संघांनी २८ जुन २०२२ रोजी ऑनलाईन पद्धतीने गुगलवर जावुन subrotocup registration २०२२ ही लिंक सर्च करुन आपल्या शाळेचे रजिस्ट्रेशन करुन, सहभागी होणाऱ्या खुळाडुंची तसेच संघाची नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच आपण केलेल्या नोंदणीचा पुरावा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक येथे ३० जुन २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजे पर्यंत १०० रुपये प्रवेश शुल्क आणि खेळाडुंच्या यादीसह सादर करावयाचा आहे. ज्या संघांची नोंदणी वरील संकेतस्थळावर केलेली नसेल त्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही यांची नोंद घ्यावी, असेही शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद करण्यात आले आहे.
याबरोबरच सुब्रतो मुखर्जी स्पोर्टस एज्युकेशन सोसायटीच्या वतीने २०२२ – २३ या वर्षातील राष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन ०१ सप्टेंबर 2022 ते १७ आक्टोंबर २०२२ या कालावधीत करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यापुर्वी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तर स्पर्धेचे आयोजन करावे लागणार आहे. त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील १४ वर्षा खालील मुले आणि १७ वर्षा खालील मुले व मुलीं या गटांमध्ये फुटबॉल स्पर्धेचे आयोजन ०६ जुलै 2022 पासुन करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी घेवू इच्छिणाऱ्या १४ वर्षाखालील खेळाडू हा ०१ जानेवारी २००९ रोजी किंवा त्यांनतर जन्मलेला असावा. १७ वर्षाखालील खेळाडू हा ०१ जानेवारी २००६ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. कोविड – १९ च्या प्रादुर्भावा नंतर होणाऱ्या या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागुल यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.





