आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडूंचा सहभाग
नाशिक :- नाशिक जिल्हा जुदो असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र जुदो असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल, हिरवाडी, पंचवटी येथे दिनांक ८ ते १० जुलै, २०२२ दरम्यान २ ऱ्या महाराष्ट्र राज्यस्तरीय जुदो चॅम्पियनशिप लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्युदो हा वैयक्तिक खेळ असला तरी खेळाडूंमध्ये संघ भावना निर्माण व्हावी यासाठी मागील वर्षांपासून नाशिक ज्युदो असोसिएशनने या सांघिक स्पर्धेच्या आयोजनाची सुरवात केली आहे हे अभिमानाची बाब आहे अश्या भावना सर्वांनी व्यक्त केल्या
या स्पर्धा जुदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या नियमावलीप्रमाणे खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धामध्ये १० संघ सहभागी होणार असून प्रत्येक संघामध्ये पाच पुरुष आणि पाच महिला अश्या दहा खेळाडूंचा समावेश असणार आहे. या स्पर्धा संमिश्र पद्धतीने खेळविल्या जाणार आहेत.

या स्पर्धेमध्ये महराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील राज्य, राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय स्पर्धामध्ये उत्तम कामगीरी करून पदक प्राप्त केलेले नावाजलेले खेळाडू यांनी आपला सहभाग निश्चित केलेला आहे.
या स्पर्धेसाठी आय. पी. एल. प्रमाणे दहा संघांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये बाळकृष्ण धोंडगे यांचा रायगड चॅलेंजर्स, सुहास विश्वासराव यांचा शिवनेरी किंग्स, पदमसिंह शेरकर यांचा तोरण टाईगर्स, जयश्री पटवर्धन यांचा हरीहर हंटर्स, अविनाश वाघ, आमरीश खोडके, संतोष कर्डेल, भगवान दराडे यांचा अंकाई अटँकर्स, शिल्पा शिरिगर विजय यादव, स्मिता शेट्टी, प्रीती यांचा तुंग टायटन्स, विजयकुमार पाटोळे ,संतोष बाबर, वृषाली,श्रीकांत यांचा पन्हाळा पिलर्स, दुर्गा जाधव, सुनीता साबळे, पावन कस्तुरे, ऋषिकेश वाघचौरे यांचा लोहंगड लिजंट्स, अमित गोरे, चोपडे यांचा चंदेरी क्रेकर्स, विनायक मिसाळ, योगेश दांगट यांचा कोंढणा वॉरियर्स या दहा संघांचा समावेश आहे. प्रत्येक संघामध्ये पाच पुरुष आणि पाच महिला अश्या दहा खेळाडूंचा समावेश असणार आहे. यामध्ये १५ ते १८ वयोगट, १५ ते २१ आणि १५ वर्षापुढील खुला गट असे वयोगट असणार आहेत. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये पुरुषांमध्ये ज्यूनियर गटासाठी ५५ किलो, ६० किलो, ६६ किलो, ७३ ते ८१ किलो तर सिनियर गटासाठी ६६ किलो आणि ७३ किलो हे वजनी गट असणार आहेत. तर महिलांसाठी ज्यूनियर गटासाठी ४४ किली, ४८ किलो, ५२ किलो, ५७ किलो तर सिनियर गटासाठी ६३ किलो आणि ७० किलो असे दोन वजनी गट असणार आहेत.

या स्पर्धामध्ये सहभागी असलेल्या दहा संघाची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात येणार असून प्रथम गटवर साखळी सामने खेळविले जाणार आहेत आणि त्यानंतर गटवर साखळीमधील कामगिरीच्या आधारे दोन्ही गटातून पहिले दोन संघ पुढील टप्यासाठी पात्र ठरणार आहेत. या चार संघा मध्ये दोन उपांत्य सामने तीसऱ्या क्रमांकाचा सामना आणि अंतिम सामना खेळविला जाणार आहे.या स्पर्धेमध्ये विजयी ठरणाऱ्या संघाला रुपये एक लाख आणि आकर्षक चषक, तर उपविजयी संघाला रुपये एक्कावंन्न हजार आणि चषक तर तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या संघाला एकतीस हजार रुपये याबी चषक प्रदान करण्यात येणार आहे.या स्पर्धेला नाशिकचे आमदार अॅडव्होकेट राहुल ढीकले, मित्र विहार क्लब आणि यशवंत व्यायाम शाळा यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. या पत्रकार परिषदेला नाशिक जिल्हा जुडो असोसिएशनचे सचिव डॉ. रत्नाकर पटवर्धन, यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, साई प्रशिक्षक विजय पाटील, या स्पर्धेचे डायऱेक्टर अमोल देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जुडो प्रशिक्षक योगेश शिंदे, स्वप्नील शिंदे, मैंद सुहास आणि सहकारी परिश्रम घेत आहेत.






