खेळाडूंनी मेहनत करून देशाचे नांव उंचवावे – आमदार अॅड. राहुल ढिकले
जुदो खेळाच्या लीग स्पर्धामुळे खेळाडूंमध्ये संघ भावना निर्माण होण्यास मोलाची मदत – विनोद कपूर, अध्यक्ष मित्र विहार क्लब
नाशिक : नाशिक जिल्हा जुदो असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र जुदो असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या २ ऱ्या महाराष्ट्र राज्यस्तरीय जुदो चॅम्पियनशिप लीग स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरवात झाली. नाशिकच्या स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात आयोजित केलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन नाशिकच्या मित्र विहार क्लबचे अध्यक्ष विनोद कपूर, सचिव सांगळे, नाशिक जिल्हा जुदो असोसिएशनचे सचिव तथा जेष्ठ संघटक डॉ. रत्नाकर पटवर्धन, यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दिपक पाटील, राज्य जुदो असोसिएशनचे खजिनदार रवींद्र मेटकर, क्रीडा संघटक आनंद खरे, राष्ट्रीय खेळाडू तथा उद्योजक सुरेश कापडीया, साईचे प्रशिक्षक विजय पाटील, या स्पर्धेचे डायरेक्टर अमोल देसाई यांच्या उपस्थतीत संपन्न झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक दुर्गा जाधव आणि योगेश शिंदे यांनी केले.

यावेळी सहभागी दहा संघानी संचालन करून उपस्थितांना मानवंदना दिली.या वेळी बोलतांना विनोद कपूर यांनी सांगितले की जुदो सारख्या वैयक्तीक खेळाच्या स्पर्धा संघ तयार करून सांघिक स्पर्धा आयोजित केल्यामुळे खेळाडूंमध्ये संघभावना तयार होण्यास मोलाची मदत झाली आहे. मित्र विहार क्लबकडून जुदो खेळला कायमच सहकार्य दिले आहे यापुढेही असेच सहकार्य मिळेल असे सांगितले. यावेळी दिपक पाटील, डॉ. रत्नाकर पटवर्धन यांनीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धाला आमदार अॅड. राहुल ढिकले यांनी भेट देवून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की मी जुदोचा राष्ट्रीय, विद्यापीठ खेळाडू आहे. या खेळामुळे मला माझ्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात खूप फायदा झाला आहे. त्यामुळे खेळाडूंनी मेहनत करून आपल्या जिल्ह्याचे आणि राज्याचे नांव देशात आणि परदेशात उंचवावे असे सांगितले, आणि या स्पर्धेच्या सुंदर आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.

या स्पर्धेमध्ये रायगड चॅलेंजर्स, शिवनेरी किंग्स, तोरण टाईगर्स, हरीहर हंटर्स, अंनकाई अटॅकर्स, तुंग टायटन्स, पन्हाळा पिलर्स, लोहगड लिजंट्स, चंदेरी क्रॅकर्स आणि कोंढणा वॉरियर्स या दहा संघांचा समावेश आहे. प्रत्येक संघामध्ये पाच पुरुष आणि पाच महिला अश्या दहा खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धेमध्ये ५५ किलो, ६० किलो, ६६ किलो, ७३ ते ८१ किलो वजनी गट आहेत. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा शिंदे, आदित्य धोपवकर, गौतमी कांचन, केतकी गोरे आणि राष्ट्रीय खेळांडु वैष्णवी खलाने, करुणा थत्तेकर, ईशान सोनवणे, मनीष खवळे, भक्ति भोसले, मिथीला भोसले, शुभांगी राऊत, शायना देशपांडे, निशांत गुरव, हर्षवर्धन निकम आदी खेळाडूंचा समावेश आहे. यावेळी या दहा संघांचे संचालक (मालक) यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या स्पर्धामध्ये सहभागी असलेल्या दहा संघाची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली असून प्रथम गटवार साखळी सामने खेळविले जात आहेत. त्यानंतर गटवार साखळीमधील कामगिरीच्या आधारे दोन्ही गटातून पहिले दोन संघ पुढील टप्यासाठी पात्र ठरणार आहेत.आज खेळल्या गेलेल्या साखळी सामन्यात “ अ ” गटामध्ये शिवनेरी किंग्स संघाने हरीहर हंटर्स संघावर ६० विरुद्ध ४० अशी २० गुणांनी मात करून विजयी सलामी दिली. तर अंनकाई अटॅकर्स संघाने तुंग टायटन्सला ७० विरुद्ध ३० अश्या ४० गुणांनी पराभूत केले. तीसऱ्या सामन्यात रायगड चॅलेंजर्स संघाने हरीहर हंटर्सला ६० विरुद्ध ४० अश्या २० गुणांनी पराभूत केले. “ब” गटात झालेल्या पहिल्या सामन्यात चंदेरी क्रॅकर्स संघाने कोंढणा वॉरियर्स संघावर २० गुणांनी मात करून आपला पहिला विजय साजरा केला. तर तोरणा टाईगर्स विरुद्ध लोहंगड लिजंट्स यांच्यात झालेल्या चुरशीच्या दुसऱ्या सामन्यात तोरणा टाईगर्सने शेवटची लढत जिंकून हा सामना ६० विरुद्ध ५० अश्या दहा गुणांनी जिंकून विजय मिळविला. तर तिसऱ्या सामन्यात पन्हाळा पिलर्स संघाच्या खेळांडुनी प्रथमपासून आक्रमक भूमिका घेत चंदेरी क्रेकर्स संघाचा ८०-२० अश्या ६० गुणांनी पराभव करून विजयाच्या दिशेने आपली वाटचाल सुरू केली.या स्पर्धेमध्ये विजयी ठरणाऱ्या संघाला रुपये एक लाख आणि आकर्षक चषक, तर उपविजयी संघाला रुपये एक्कावंन्न हजार आणि चषक तर तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या संघाला एकतीस हजार रुपये आणि चषक प्रदान करण्यात येणार आहे.या स्पर्धेला नाशिकचे आमदार अॅडव्होकेट राहुल ढीकले, मित्र विहार क्लब आणि यशवंत व्यायाम शाळा यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.या स्पर्धेची तांत्रिक बाजू या स्पर्धेचे संचालक अमोल देसाई, रवींद्र मेतकर, विजय पाटील, योगेश शिंदे, स्वप्नील शिंदे, सुहास मैद, माधव भट, अजिंक्य वैद्य, दुर्गा जाधव, गौरव पगारे, सजू पाठक आणि त्यांचे सहकारी पार पाडत आहेत.






