आदित्य धोपावकर आकांक्षा शिंदे यांना सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान, प्ले द गेम, इन द स्पिरीट ऑफ द गेम – पोलिस निरीक्षक रणजित नलावडे, खेळांडुनी जुन्या पिढीच्या संयोजकाचे योगदान लक्षात ठेवावे – गौरी पटवर्धन
नाशिक जिल्हा जुदो असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र जुदो असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या २ ऱ्या महाराष्ट्र राज्यस्तरीय जुदो चॅम्पियनशिप लीग आमदार चषक स्पर्धेमध्ये खेळल्या गेलेल्या अत्यंत चुरशीच्या अंतिम लढतीत रायगड चॅलेंजर्स संघाने ४-४ अश्या बरोबरीनंतर अंतिम सामन्यात विजय मिळवत तोरणा संघाला पराभूत करून या स्पर्धेचे विजेतेपदावर आपले नांव कोरले.

या अंतिम सामन्यात पहिल्या दोन लढती जिंकून रायगड संघाने २-० अशी आघाडी मिळविली. परंतु त्यानंतर झालेल्या महिलांच्या दोन लढतीत तोरणा टाईगर्सच्या खेळाडूनी जोमाने खेळ करून या दोन लढती जिंकून २-२ अशी बरोबरी साधली. त्यानंतर झालेल्या पुरुषांच्या दोन लढतीत एक सामना रायगडने जिंकला, तर दूसरा सामना तोरणा संघाने जिंकून पुनः ४-४ अशी बरोबरी प्रस्थापित केली. त्यानंतर खेळल्या गेलेल्या महिलांच्या अंतिम लढतीवर या स्पर्धेचे विजेतेपद अवलंबून होते. रायगडकडून आकांक्षा शिंदे (नाशिक) आणि रेवती साळुंके (सांगली) यांच्यातील ही लढत अत्यंत चुरशीची झाली. सुरवातीला दोन्हीही खेळाडूंनी सय्यमाने खेळ केला. मात्र त्यानंतर आकांक्षा शिंदेने आक्रमक पवित्रा घेत रेवतीला आपल्या खांद्यावर उचलून घेत ओगोशीचा सुंदर डाव टाकून रेवतीला चीत करण्यात यश मिळीवले आणि ही लढत जिंकून आपल्या संघाला या स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्यात महत्वाची भूमिका पार पडली.
विजेत्या रायगड संघांला प्रमुख पाहुणे पोलिस निरीक्षक रणजित नलावडे, ज्येष्ठ जुदो संघटक दिवंगत भास्कर पटवर्धन यांची कन्या गौरी पटवर्धन, यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दिपक पाटील, जिल्हा ज्युदोचे सचिव डॉ. रत्नाकर पटवर्धन, राज्य जुदो असोसिएशनचे खजिनदार रवींद्र मेतकर, क्रीडा संघटक आनंद खरे, साईचे प्रशिक्षक विजय पाटील यांच्या हस्ते आकर्षक चषक, रोख रुपये एक लाख आणि प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. उपविजयी तोरणा संघाला आकर्षक चषक, पन्नास हजार रुपये, तर तीसऱ्या क्रमांकाच्याशिवनेरी संघाला चषक आणि तीस हजार रुपये प्रदान करून गौरवण्यात आले. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगरी करणाऱ्या आदित्य धोपावकर (नगर) याला सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू तर महिलामध्ये आकांक्षा शिंदे (नाशिक) हिला सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून जुदोचे राष्ट्रीय खेळाडू आणि प्रसिद्ध उद्योजक सुरेश कापडिया यांच्यातर्फे प्रत्येकी पाच हजार रुपये देवून गौरवण्यात आले.
यावेळी बोलतांना पोलिस निरीक्षक रणजित नलावडे यांनी सांगितले की खेळाडूंनी स्पोर्टसमन स्पीरीट दाखवून खेळ करावा आणि समाजासमोर खेळाची चांगली प्रतिमा निर्माण करावी असे सांगितले. तर गौरी पटवर्धन, दिपक पाटील, डॉ. रत्नाकर पटवर्धन यांनीही खेळाडूंचे अभिनंदन केले.
या स्पर्ध्याची तांत्रिक बाजू स्पर्धेचे संचालक अमोल देसाई, रवींद्र मेतकर, विजय पाटील, योगेश शिंदे, स्वप्नील शिंदे, सुहास मैद, माधव भात, अजिंक्य वैद्य, दुर्गा जाधव, संजू पाठक गौरव पगारे आणि त्यांचे सहकारी यांनी यशस्वीरीत्या सांभाळली.
अंतिम निकाल :- १) रायगड चॅलेंजर्स – विजेता संघ
२) तोरणा टाईगर्स – उपविजेत संघ
३) शिवनेरी किंग्स – तृतीय क्रमांक
सर्वोत्कृष्ट खेळाडू :- पुरुष -आदित्य धोपावकर(नगर) महिला- आकांक्षा शिंदे(नाशिक)






