
७५ स्वातंत्र सेनानीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करतांना नाशिकचे उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, सोबत राजू देसले अशोक दुधारे, अशोक कदम, दीपक पाटील, आनंद खरे, अविनाश खैरनार आणि इतर मान्यवर.
नाशिक : संपूर्ण देशामध्ये भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे.
यासाठीच नाशिकच्या शिक्षिका सौ विजया अशोक दुधारे यांनी नाशिकच्या हुतात्मा स्मारक येथे भारताचे ७५ स्वातंत्र्य वीर यांच्या चित्र आणि महितीसह प्रदर्शन आयोजित केले आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन नाशिकचे उपजिल्हाधीकारी नितीन मुंडावरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कामगार आणि सामाजिक चळवळीतील नेते राजू देसले, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे, अविनाश खैरनार, राजू शिंदे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम, जिल्हा क्रीडा समिती अध्यक्ष दीपक पाटील, अशोक दुधारे, अजिंक्य दुधारे अस्मिता दुधारे-मोगल, मधुकर देशमुख, शशांक वझे, रमेश मारवाडी, विक्रम दुधारे आणि दुधारे परिवार उपस्थित होते.
या वेळी बोलतांना नितीन मुंडावरे यांनी सांगितले की सौ. विजया दुधारे यांनी केवळ आपल्या शाळेच्या मुलांसाठीच मर्यादित न रहाता समाजाच्या प्रत्येक घटकाला माहिती व्हावी यासाठी या ७५ स्वातंत्र्य सेनानीची फोटोसह माहिती तयार करून तो समाजापुढे जावी यासाठी हा उपक्रम राबवला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि विशेषत: आजच्या नवीन पिढीला या स्वातंत्र्य सेनानीची इत्यंभूत माहिती मिळेल, यासाठी त्यांचे कौतुक आहे असे सांगितले. यावेळी राजू देसले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सौ विजया यांनी यामागील भावना व्यक्त करतांना सांगितले की, केवळ देशभक्तीच्या भावनेने आणि आपल्या स्वातंत्र्य सेनानीच्या कार्याची माहिती सर्वांपर्यंत पोहचावी यासाठी गेल्या तीन महिन्यापासून याची तयारी केली होती असे सांगीतले. तसेच या उपक्रमासाठी मला माझ्या घरचे सहकारी आणि हितचिंतक यांनी सहकार्य केल्यामुळे हे प्रदर्शन सादर करणे शक्य झाले असे सांगीतले.
हे प्रदर्शन दिनांक १७ ऑगस्टपर्यन्त असणार आहे. तरी नाशिकच्या नागरीकांनी आणि विद्यार्थ्यांनी येथे भेट द्यावी असे आवहान सौ. विजया दुधारे यांनी केले आहे.






