नाशिक – मुबलक पाण्यासाठी प्रसिद्ध असलेले नाशिकहे भूजल पातळी खालावण्यात राज्यात अव्वल असल्याची बाब नुकतीच पुढे आली तसेचनाशिकमध्ये आलेला महापूर हे अतिशय चिंताजनक असून नाशिकच्या तापमानातही झपाट्याने वाढ होत आहे. त्यावर एकमेव उपाय म्हणजे झाडे लावणे. याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी तपोवन मार्गावरील जीबिएस सेवाभावी संस्थेतील गोसावी सर यांच्या माध्यमातून मुलांमध्ये जनजागृती करून बीजगोळांचे (सीडबॉल) वाटप केले.
झाडे लावणे हे काम करताना अनेकांना कंटाळवाणे वाटते तसेच वेळ व परिश्रम जास्त लागतो. वृक्षरोपणाचे काम करताना मुलांना आनंद वाटावा व झाडांचेही रोपण केले जावे याकरिता बिजांचे गोळे तयार करून ते आसपास पाण्याचे स्त्रोत असलेल्या परिसरात फेकले तर त्या बीजगोळांचे झाड तयार होऊन पर्यावरणाचे संतुलन बिघडणार नाही व मुलांना यातून आनंदही मिळेल. परदेशी झाडेही फक्त शोभेसाठी असल्याने त्यावर पक्षी बसत नाही. त्यामुळे भारतीय प्रजातींची चिंच, सागरगोटा, चिलार, जांभूळ, करंज आदी झाडांचे देशी बियाणे जमाकरून बीजगोळे (सीडबॉल) तयार करून मुलांमध्ये याचे वाटप केले आहे. मुलांमध्ये पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी व पर्यावरणाचे संरक्षण व्हावे याकरिता मुलांच्या घराजवळील मोकळ्या परिसरात हे बीजगोळे (सीडबॉल) टाकण्यात येणार असल्याचे यावेळी शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस योगेश निसाळ, संतोष भुजबळ , स्वप्निल फुले, मितेश राठोड, संतोष पुंड, शुभम पाटील, सचिन मोगल, विनायक जाधव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
असे तयार केले ‘सीडबॉल्स’
‘सीडबॉल्स’ हे महारुद्रा नर्सरीत तयार केले. ‘सीडबॉल्स’ तयार करण्यासाठी माती, शेण, खत व देशी बियाणे वापरले. एक दिवस आधी बियाण्यांना धुवून त्यांना स्वच्छ पुसले. कोरडे झाल्यावर त्यावर हळदीचा लेप लावला. त्यानंतर त्याला खत व शेणाच्या मिश्रणात मिसळून त्याचे गोळे तयार केले. ‘सीडबॉल’मध्ये पोषक मुल्ये असल्यामुळे बीज जमिनीत रुजेपर्यंत तग धरतील.




