नाशिक :- पुणे येथे दिनांक ७ ते ११ ऑगस्ट, २०१९ दरम्यान महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
१० वर्षाआतील मुले – मुली आणि १३ वर्षाआतील मुले – मुली अश्या दोन गटांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत नाशिकच्या श्रावणी वाळेकरने १३ वर्षे मुलीच्या गटात अप्रतिम खेळ करून अंतिम लढतीत मुंबईच्या नायेशा भटोयेचा २१- १४, २१-१३ अश्या दोन सेटमध्ये पराभव करून या स्पर्धेचे एकेरीचे विजेतेपद पटकावले.
तर १३ वर्षे मुलींच्या गटात दुहेरी प्रकारातही श्रावणी वाळेकरने आपली दुहेरीची मुंबईची जोडीदार तारिणी सुरीच्या साथीने खेळतांना आपआपसात सुंदर समन्वय राखत अंतिम लढतीत दुसरे मानांकन असलेल्या कुंजल मंडलिक ( अमरावती ) आणि क्रिशा सोनी ( नागपूर ) या जोडीचा २१- १५ आणि २१- १६ असा पराभव करून दुहेरीचेच्या विजेतेपदावर आपली मोहर उमटवत या स्पर्धेत दुहेरी धमाका उडवला.
श्रावणीचा एकेरी आणि दुहेरीतही धमाका :- श्रावणी वाळेकरने एकेरीत खेळतांना उपउपांत्य फेरीत नागपूरच्या क्रिशा सोनीचा २१-१०, २१- १९ असा पराभव केला, तर उपांत्य फेरीत प्रथम मानांकित रायगडच्या रक्षा कंदास्वामीचा २१- १६ , ०८-२१ आणि २१-११ असे पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम लढतीत दुसरे मानांकन असलेल्या मुंबईच्या नायेशा भटोयेविरुद्ध खेळतांना श्रावणीने अगदी संय्यमाने खेळ करून कधी जोरदार स्मेशेश तर कधी नेटजवळ सुंदर ड्रॉप्स टाकून पहिला सेट २१- १४ असा जिंकून १-० अशी आघाडी मिळविली. तर दुसऱ्या सेटमध्येही श्रावणीने आपल्या खेळात सात्यत्य राखत दुसरा सेटही २१- १३ असा जिंकून या महाराष्ट्र बॅडमिंटन स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. या गटाच्या दुहेरीत खेळतांना श्रावणीने मुंबईच्या तारिणी सुरीच्या साथीने खेळतांना आपआपसात सुंदर समन्वय साधून खेळ केला. श्रावणी आणि तारिणीने उपउपांत्य फेरीत रिमा शहा आणि श्रेय्या शिंदे यांचा २१- १५. २१-०२ असा सहज पराभव केला, तर उपांत्य फेरीत ईशा पाटील( ठाणे ), आणि निर्मिती गजभिये (मुंबई या जोडीला अटीतटीच्या सामन्यात २२२-२० आणि २१-१७ असे पराभूत करून अंतिम फेरीत गाठली. तर अंतिम लढतीत श्रावणी आणि तारीनी यांनी अमरावतीच्या कुंजल मंडलिक आणि नागपूरच्या क्रीशा सोनी या दुसरे मानांकन असलेल्या जोडीशी खेळतांना प्रथमपासून आघाडी घेत पहिला सेट २१-१५ असा जिंकला, तर दुसऱ्या सेटमध्येही तोलामोलाचा खेळ करून हा सेटही २१-१६ असा जिंकून दुहेरीच्या विजेतेपदावर आपला हक्क प्रस्थापित केला. हे दोन्हीही विजेतेपद मिळविणाऱ्या श्रावणीला एका दिवसातच या दोन्हीही प्रकारात काही तासांच्या अंतराने सामने खेळावे लागले. असे असले तरीही तीने आपल्या खेळात सात्यत्य राखून खेळ करत हे आवाहन यशस्वीपणे पेलत या दोन्हीही प्रकारात विजेतेपदावर आपली मोहर उमटवली.
दर्शित राजगुरूला उपविजेतेपद – या स्पर्धेत १० वर्षे वयोगटात खेळतांना नाशिकच्या दर्शित राजगुरूनेही चांगला खेळ करून अंतिम फेरी गाठली. तिने अंतिम लढतीत निमिषा कोटेचाशी चांगली लढत दिली. मात्र तिला १५-२१ आणि १६-२१ अश्या फरकाने पराभव पत्करावा लागल्यामुळे तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
श्रावणी वाळेकर आणि दर्शित राजगुरू यांनी याआधी मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. तर नाशिकमधील विविध स्पर्धामध्येही त्यांनी विजेतेपद मिळविले आहे. त्याचप्रमाणे श्रावणीने दोन महिन्यापूर्वी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रचे प्रतिनिधीत्व केले आहे.
श्रावणी वाळेकर ही सिल्वर ओक शाळेत ७ वीत शिकत असून दर्शिता राजगुरू सिबॉयसेस शाळेची ४ थीची विद्यार्थीनी आहे. या दोघीही गेल्या पाच वर्षांपासून गंगापूर रोड येथील शिवसत्य क्रीडा मंडळात मकरंद देव यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहेत. श्रावणीच्या आणि दर्शीताच्या या यशामध्ये त्यांचे पालकांचाही फार मोलाचा वाटा आहे. तसेच या खेळाडूंना नितीन शिरभाते, नरेश पाटील आणि यशवंत जाधव यांचे शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी मोलाचे सहकार्य मिळत आहे.
शिवसत्य मंडळाच्या खेळाडूंच्या या यशाबद्दल या खेळाडूंचे आणि प्रशिक्षक मकरंद देव यांचे शिवसत्य मंडळाचे उपाध्यक्ष अनिल सोनवणे, माजी स्थायी समिती सभापती सौ. हिंमगौरी आहेर – आडके, नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष राध्येश्याम मुंदडा, अनंत जोशी, सचिव योगेश एकबोटे आणि सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. श्रावणी, दर्शिता, पार्थ, सक्षम, ईशान या सर्व खेळाडूंची प्रगती बघता पुढील काळात हे खेळाडू नाशिकला बॅडमिंटनमध्ये वेगळी ओळख मिळवून देतील अश्या भावना यावेळी क्रीडाप्रेमींनी व्यक्त केल्या.
अंतिम निकाल :-
१३ वर्षे मूली एकेरी – १) श्रावणी वालेकर- विजेती २) नायेशा भटोये -उपविजयी
१३ वर्षे मूली दुहेरी – १) श्रावणी वालेकर आणि तारिणी सुरी – विजेती २) कुंजल मंडलिक ( अमरावती ) आणि क्रिशा सोनी -उपविजयी
१० वर्षे मूली एकेरी – १) निमिषा कोटेचा – विजेती २) दर्शित राजगुरू -उपविजयी






