नाशिक – कबड्डी या खेळाला वेगळी ओळख मिळाली आहे. त्यामुळे गुणवत्ता असणाऱ्या युवकांना आपले कौशल्य दाखविण्याची जास्तीत जास्त संधी मिळवी यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणाऱ्या पुणेरी पलटनच्या पुढाकारने आणि नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने नाशिकच्या मीनाताई ठाकरे, विभागीय क्रीडा संकुल येथे रविवार दिनांक २५ ऑगस्ट, २०१९ रोजी २० वर्षा आतील मुलांसाठी नाशिक जिल्हा आंतर क्लब कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धाच्या अंतिम सामन्यात अत्यंत अटीतटीच्या लढ़तीत आडगांवच्या शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या संघाने शेवटच्या चढाईत निर्णायक दोन गुण वसूल करुन या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तर ब्रम्हा स्पोर्ट्स क्लबला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेत उत्कृष्ट चढाईपटु म्हणून शिवशक्ती क्लबच्या सनी मते, तर उत्कृष्ट बचावपटु म्हणून ब्रम्हा स्पोर्ट्स क्लबच्या ओंकार कोकाळे यांची निवड करण्यात आली.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक आनंद खरे, भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे सरचिटणीस अमित घुगे, साई ९ संस्थानचे संस्थापक अध्यक्ष, तथा ९ कॉइन संस्थेचे संचालक साईराज गायकवाड, आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षिका शैलजा जैन,तालुका क्रीडा अधिकारी व कबड्डी प्रशिक्षिका गीता साखरे-कांबळे,राज्य संघटनेचे संयुक्त कार्यवाह मोहन गायकवाड,उपाध्यक्ष प्रकाश बोराडे,प्रशांत भाबड, विलास पाटील ,बाळासाहेब जाधव यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला.
या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाना आकर्षक चषक मेडल, रीस्ट बैंड आणि टी शर्ट प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेत जिल्ह्यातील २४ संघानी सहभाग घेवून चांगला प्रतिसाद दिला. स्पर्धाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात ब्रम्हा स्पोर्टस क्लब संघाने नाशिक रोडच्या शिखरेवाडी संघावर ३१ – २४ अशी मात करुन अंतिम फेरी गाठली. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात शिवशक्ती संघाने क्रीडा प्रबोधीनी संघावर १५ – १३ असा निसटता विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवीला.
या स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. शेवटपर्यंत रंगलेल्या या अंतिम सामन्यात ब्रम्हा संघाने चांगला खेळ करुन पहिल्या सत्रात ०९ -०७ अशी आघाडी घेतली. तर दुसऱ्या सत्रातही चढाई आणि बचाव या दोन्हीमध्ये वर्चस्व राखत १७ – १६ अशी आघाडी कायम राखली. मात्र तर शिवशक्तीकडून खेळणाऱ्या सनी मते आणि मगदूम सैय्यद यांनी आक्रमक चढाया करून गुण वसूल केले, तर आदिनाथ मते,अमोल जाधव,वैभव मते,शेखर मते,स्वपनील जाधव,विकास मते यांनी एकमेकात चांगला समन्वय साधून पकडी केल्या. त्यांच्या या सांघिक खेळाच्या जोरावर आपले शिवशक्ती संघाने आपले आवहान कायम राखले. या सामन्याच्या निर्णायक क्षणी सनी मतेने चढाईमध्ये दोन खेळाडूना बाद करण्यात यश मिळविले. त्याच्या या कामगिरीमुळे शिवशक्ती अडगाव संघाने ब्रम्हा स्पोर्ट्स क्लबचा १९ विरुद्ध १७ अश्या दोन गुणांनी पराभूत करून या स्पर्धेच्या विजेतेपदवर आपले नाव कोरले. पराभुत ब्रह्मा संघाकडून अमोल पोकळे, अभय हिंदे,प्रसाद हळदे, गौरव सूर्यवंशी यांनी चांगले प्रयत्न केले परंतु त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.तृतीय क्रमांकाचे पारितोषिक नाशिकच्या क्रीडाप्रबोधनीने तर शिखरेवाडी क्रीडा मंडळाने चौथ्या क्रमांक मिळविला.
या संपूर्ण स्पर्धेत आपल्या चढायामध्ये सातत्य रखणारा आणि अंतिम सामन्यात शेवटच्या चढ़ाईत महत्वाचे दोन गुण मिळवत संघाला विजयी करणाऱ्या शिवशक्तीच्या सनी मतेला उत्कृष्ट चढाईपटु म्हणून तर पकडी मध्ये आपले नैपुण्य दाखविणारा ब्रम्हा क्लबच्या ओंकार कोकाळेला उत्कृष्ट बचावपटु म्हणून आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत पंच म्हणून डॉ. दत्ता शिम्पी, राजेंद्र निकुभ, जॉर्ज स्वामी, रहेमान शेख, महेन्द्र वानखेड़े, चंद्रकांत ढीकले, रवी खैरे, दत्ता जाधव, पुष्पा चौधरी यांनी जबाबदारी पर पाडली.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशांत भाबड, विलास पाटिल, शरद पाटिल, राकेश खैरनार आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी परिश्रम घेतले.
या स्पर्धेचे उद्घाटन नाशिक शहराच्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गिरीश पालवे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे,शिवछत्रपती पुरस्कार विजेते नरेन्द्र छाजेड,अविनाश खैरनार, मोहन गायकवाड, प्रकाश बोराडे, विलास पाटील ,शैलजा जैन, गीता साखरे,बाळासाहेब जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.






