नाशिक : कृषी उत्पादनापासून ते शेतमाल निर्यातीमध्ये नाशिकचा नावलौकिक आहे. विविध कृषी उत्पादने आणि प्रयोगशील शेतकऱ्यांमुळे नाशिक जिल्ह्याला भारतभर लौकिक प्राप्त झाला आहे. कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचे माहितीपर स्टॉल्स, जाणकारांशी भेटी, चर्चासत्राच्या माध्यमातून समस्यांचे निराकरण, प्रयोगशील सर्वस्तरीय शेतकऱ्यांचा गौरव करणारे अभिनव व्यासपीठ म्हणून नाशिक येथे आयोजित होणारे कृषीथॉन भारतातील अग्रगण्य प्रदर्शन म्हणून ओळखले जाते. यंदा २१ ते २५ नोव्हेंबर दरम्यान ठक्कर डोम, ए.बी.बी. सर्कलजवळ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक संजय न्याहारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नाडाचे पदाधिकारी अरुण मुळाणे, लक्ष्मण जगताप, मंगेश तांबट, चंद्रकांत ठक्कर, सतीश सोनजे, विजय खैरनार,नितीन मराठे हे उपस्थित होते.
कृषी क्षेत्रातील नवनवीन घडामोडींची माहिती करून देण्यासाठी १९९८ पासून कृषीथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. या शृंखलेतील १७ व्या कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी सुरु झाली असून आंतरराष्ट्रीय पातळीच्या उद्योगांची कृषी उत्पादनांना व नवनवीन संशोधन करणाऱ्या संस्थांना सहभागासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. यावर्षी कृषी क्षेत्रातील स्टार्टअप, जैविक शेती, दर्जेदार डाळिंब उत्पादन, कृषी शिक्षण व संशोधन परिसंवाद, कांदा व टोमॅटो पीक परिसंवाद, मातीचे आरोग्य व त्यामधील जिवाणूंचे महत्व, मूल्यवर्धित कृषी उत्पादने, हायड्रोपोनिक शेती, सैपरेझ टेक्नोलॉजी, कृषीक्षेत्रातील रोजगाराच्या संधी इ. विषयांचा अंतर्भाव चर्चासत्रात करण्यात येणार आहे. प्रदर्शनात करिअर जॉब फेअरद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. ‘प्रश्न शेतकऱ्यांचे, मार्गदर्शन तज्ज्ञांचे’ हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याची माहिती सहआयोजक साहिल न्याहारकर यांनी सांगितले.
यावेळी नाडाचे उपाध्यक्ष अरुण मुळाणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले कि, कृषीथॉन प्रदर्शनात दरवर्षीप्रमाणे प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे १७ आदर्श कृषी सेवा केंद्राचा सन्मान करत असतो. कृषीथॉनमध्ये युवा पुरस्कारासह विविध श्रेणीत पुरस्कार दिले जातात ही एक गौरवाची बाब आहे. कृषीथॉन प्रदर्शनातून नेहमीच शेतीला सन्मान दिला जात असल्याचे श्री. मुळाणे यांनी सांगितले. कृषीथॉनचे संचालक नितीन मराठे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले कि, कृषीथॉन प्रदर्शनात मूल्यवर्धनचे (व्हॅल्यू ऍडिशन) स्वतंत्र दालन आहे. कृषीथॉन प्रदर्शनातून उत्पादनाचे मार्केटिंग होत असल्यामुळे उत्पादकांना व्यासपीठ मिळत आहे. येथे मिलेटपासून आईसक्रीम, नर्सरी उद्योगाच्या विविध मशिनरी या बरोबर विविध पीक चर्चासत्र असल्यामुळे शेतकऱ्यांशी या प्रदर्शनात या माध्यमातून संवाद साधला जाणार आहे.
यावर्षी प्रदर्शनात कृषीक्षेत्रात कार्यरत असलेल्या राज्य, देश आणि परदेशातील नामांकित तीनशेहून अधिक कंपन्या व संस्था सहभागी होणार आहेत. दरवर्षी जवळपास दीड लाखांहून अधिक शेतकरी या प्रदर्शनाला भेट देतात. कृषी निविष्ठा उत्पादक, बियाणे, कृषी अवजारे, ट्रॅक्टर, ठिबक व तुषार सिंचन, फवारणी यंत्रे उत्पादक कंपन्या, बँका, विमा कंपन्या, कृषी संशोधन केंद्रे, विविध कृषिपूरक उद्योग, रोपवाटिका, अन्नप्रक्रिया उद्योग तसेच कृषीविषयक शासकीय विभागांचा प्रदर्शनात सहभाग असेल. कृषीथॉन २०२४ मार्फत शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून माहिती देण्यासाठी, संवाद साधण्यासाठी एक पर्वणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शेतीमातीत राबणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना कृषीथॉन शेतकरी सन्मानाने गौरविण्यात आले आहे. यावर्षीही युवा शेतकरी पुरुष व महिला गट, कृषी उद्योजक, युवा संशोधक, कृषी विस्तार व गुणवंत कृषी विद्यार्थी, कृषी महर्षी, उपक्रमशील कृषी महाविद्यालयांचा सन्मान अशा विविध गटात पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. कृषिक्षेत्राला उर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी आजच्या हवामान बदलानुरूप अचूक शेतीच्या प्रारूपाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी. उपयोगिता, संशोधन संस्था, तंत्रज्ञान या सर्वांच्या दृष्टीने हे प्रदर्शन आगळेवेगळे ठरणार आहे. या प्रदर्शनाच्या अधिक माहितीसाठी www.krishithon.com या संकेतस्थळावर किंवा ९८२२८४२२६५ या क्रमांकावर संपर्क साधावा.





