नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि केन्सीगंटन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने केनसिंगटन क्लब, गंगापूर रोड येथे दिनांक २१ आणि २२ सप्टेंबर, २०१९ दरम्यान ” एन डी. बी ए. – केन्सिंगटन बॅडमिंटन लीग” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकमध्ये बॅडमिंटनसाठी फार अनुकूल वातावरण आहे आणि नाशिकच्या कनिष्ठ गटाच्या खेळाडूंपासून ते वरिष्ठ आणि वयस्क अश्या सर्व खेळाडूंना स्पर्धेची संधी मिळावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.
या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून या स्पर्धेत नाशिकच्या सहा नामवंत क्लबच्या संघांना सहभागी करण्यात आले आहे. यामध्ये आदीश शटलर्स, डायन्यामिशट हॉट शटलर्स, एम एस जे वॉरियर्स संघ, नाशिक सुपरकिंग संघ, निवेक संघ, सुपर जायन्ट्स आणि एस.पी. वॉरियर्स या सहा संघाचा समावेश आहे.
संपूर्ण साखळी पद्दतीने खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये एकूण १२० खेळाडू आपले कसब पणाला लावणार आहेत.
उद्या शनिवार दिनांक २१ रोजी सकाळी आठ वाजता नाशिक महानगरचे पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे – पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन होणार असून याप्रसंगी
नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम मुंदडा, सचिव योगेश एकबोटे, अनंत जोशी, उपाध्यक्ष शर्मिला कुलकर्णी, केन्सीगंटन क्लबचे संचालक विक्रांत मते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सहा संघांदरम्यान खेळविल्या जाणाऱ्या या स्पर्धेत सर्व वायोगटाच्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी यासाठी प्रत्येक सामन्यात दुहेरीचे सात सामने खेळविले जाणार आहेत. यामध्ये १७ वर्षाआतील मुले ,आणि मुली, वरिष्ठ पुरुष आणि महिला आणि वयस्क गटाचे तीन दुहेरी सामने असे सात सामने असणार आहेत.
ट्रम्प गुणामुळे चुरस – या स्पर्धेसाठी असलेल्या नियमवालीनुसार प्रत्येक संघातील जोडीला या पाच साखळी सामन्यापैकी कोणत्याही एका सामन्यात ट्रम्प पद्धतीने खेळण्याची मुभा असणार आहे. यामध्ये जिंकणाऱ्या जोडीला आणि त्यांच्या संघाला एक बोनस गुण दिला जाईल तर पराभूत जोडीला आणि त्यांच्या संघाचा एक गुण वजा होणार आहे. या नियमावलीमुळे स्पर्धेत चांगली चुरस दिसून येईल.अशी माहीती योगश एकबोटे यांनी दिली.






