किम्स मध्ये पहिले ‘स्वॅप पेअर्ड किडनी ट्रान्सप्लांट’ यशस्वी

Oct 27, 2026

दोन कुटुंबे, दोन अनोळखी माणसे आणि जीवनदानाची अनमोल भेट

नाशिक: नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत किम्स मानवता हॉस्पिटलने शहरातील पहिले ‘पेअर्ड किडनी एक्स्चेंज (स्वॅप) ट्रान्सप्लांट’ यशस्वीरीत्या पूर्ण केले. किडनी निकामी झालेल्या दोन वेगवेगळ्या कुटुंबांतील दोन रुग्णांना या शस्त्रक्रियेमुळे नवे आयुष्य मिळाले.

मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. राज नगरकर म्हणाले, “नाशिकमध्ये पहिले स्वॅप किडनी ट्रान्सप्लांट यशस्वी करणे हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. डॉ. मोहन पटेल आणि संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना अत्याधुनिक उपचार त्यांच्या शहरातच मिळावेत, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” एकाच छताखाली उपलब्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व निदान सुविधांमुळे हे यश शक्य झाले. “किडनीच्या गंभीर विकारांनी ग्रस्त रुग्णांनी आजाराच्या सुरुवातीलाच किडनी विकार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य उपचार पर्याय निवडावेत. तसेच अवयवदानाविषयीचे गैरसमज दूर करून अधिकाधिक नागरिकांनी या जीवनदायी कार्यात पुढे यावे. असे आवाहन त्यांनी केले”

हे प्रत्यारोपण डॉ. मोहन पटेल मेडिकल डायरेक्टर तथा किडनी विभागप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. किडनी ट्रान्सप्लांट सर्जन व युरॉलॉजिस्ट डॉ. उमा महेश्वरराव आणि डॉ. किशोर वाणी, युरॉलॉजिस्ट डॉ. परीक्षित महाजन, भूलतज्ज्ञ डॉ. किरणदीप संधू, ट्रान्सप्लांट समन्वयक श्री. रुपेश देवरे तसेच परिचारिका व सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

डॉ. मोहन पटेल म्हणाले, “ज्या रुग्णांची किडनी निकामी झाली आहे आणि ज्यांच्या कुटुंबात दाता उपलब्ध आहे, पण सुसंगततेच्या अडचणीमुळे तो दान करू शकत नाही, अशांसाठी स्वॅप ट्रान्सप्लांट हा एक प्रभावी पर्याय आहे. या प्रकरणात दोन्ही रुग्णांना अधिक सुसंगत किडन्या मिळाल्या, ज्यामुळे रिजेक्शन किंवा फेल्युअरचा धोका कमी होतो. अशा प्रत्यारोपणात तीव्र इम्युनोसप्रेसिव्ह औषधांची गरज कमी भासते, खर्चही कमी येतो आणि संसर्गाची शक्यताही कमी असते.” सध्या दोन्ही दाते आणि दोन्ही रुग्ण सुखरूप असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

पहिल्या कुटुंबातील पत्नी आपल्या पतीला किडनी देण्यास तयार होती, मात्र तपासणीत दोघांचे रक्तगट जुळले नाहीत. दुसऱ्या कुटुंबातील आई आपल्या मुलीला किडनी देण्यास तयार होती, परंतु तिथेही वैद्यकीय अनुकूलता नव्हती. ही दोन्ही कुटुंबे एकमेकांना ओळखत नव्हती आणि त्यांची पार्श्वभूमीही वेगळी होती. तरीही वैद्यकीय तपासणीत त्यांच्यात परस्पर जुळणी आढळली. त्यानुसार पहिल्या कुटुंबातील पत्नीने दुसऱ्या कुटुंबातील मुलीला, तर दुसऱ्या कुटुंबातील आईने पहिल्या कुटुंबातील पतीला किडनी दिली.

डॉ. किशोर वाणी म्हणाले, “स्वॅप किडनी ट्रान्सप्लांटमध्ये दोन्ही कुटुंबांतील दात्यांच्या किडनीचे कार्य (फंक्शन) जुळणे आणि शस्त्रक्रियेच्या दृष्टीने त्यांची अनुकूलता असणे अत्यंत महत्त्वाचे असते. प्रत्येक तपासणी काळजीपूर्वक करूनच जोड्या निश्चित केल्या जातात.”

डॉ. उमा महेश्वरराव म्हणाले, “स्वॅप ट्रान्सप्लांट ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. एकाच वेळी चार शस्त्रक्रिया समन्वयाने कराव्या लागतात, त्यामुळे यासाठी अनुभवी आणि मोठ्या टीमची आवश्यकता असते. आमच्या टीमच्या समन्वयामुळेच हे यश शक्य झाले.”

कधीही न भेटलेली ही दोन कुटुंबे आता आयुष्यभरासाठी एका अदृश्य नात्याने जोडली गेली आहेत. प्रत्येक दात्याने आपल्या प्रियजनासाठी केलेले दान दुसऱ्या कुटुंबासाठीही जीवनदान ठरले.

कायदा काय सांगतो
भारतीय अवयवदान कायदा, मानवी अवयव प्रत्यारोपण अधिनियम, १९९४ (THOA) नुसार आई-वडील, मुले, भावंडे, पती-पत्नी यांसारखे आपले अवयव दान करू शकतात.

किडनी आजाराचे लवकर निदान कसे कराल?
मधुमेह, उच्च रक्तदाब आणि दीर्घकालीन मूत्रपिंडविकार हे किडनीवर परिणाम करणारे प्रमुख घटक आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्तातील क्रिएटिनिन, eGFR आणि लघवीतील अल्ब्युमिन या चाचण्या नियमित केल्यास आजाराचे लवकर निदान होऊ शकते. किडनी प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांनी नेफ्रोलॉजिस्ट आणि प्रत्यारोपण तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपल्या स्थितीनुसार योग्य उपचार निवडावा.

मिलन प्रोजेक्ट : वन नेशन, वन स्वॅप ट्रान्सप्लांट’ उपक्रमाचा उद्देश आणि महत्त्व

भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली NOTTO मार्फत स्वॅप किडनी प्रत्यारोपणाला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात एकसमान व्यवस्था विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेकदा किडनी निकामी झालेल्या रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्ती किडनी दान करण्यास तयार असते. मात्र रक्तगट जुळवणी न झाल्यामुळे थेट प्रत्यारोपण शक्य होत नाही. अशा वेळी दुसऱ्या कुटुंबातील दाता आणि रुग्ण यांच्याशी योग्य जुळवणी करून दोन्ही कुटुंबांतील रुग्णांना किडनी प्रत्यारोपणाची संधी मिळू शकते.
या उपक्रमांतर्गत देशभरातील रुग्ण, इच्छुक दाते आणि प्रत्यारोपण करणाऱ्या रुग्णालयांमध्ये समन्वय वाढवणे, दाता व रुग्ण यांची योग्य जुळवणी करणे, कागदपत्रे आणि वैद्यकीय तपासण्यांसाठी एकसमान निकष विकसित करणे तसेच कायदेशीर मंजुरीची प्रक्रिया अधिक सुसंगत करणे यावर भर दिला जात आहे. त्यामुळे केवळ एका रुग्णालयापुरत्या मर्यादित न राहता, व्यापक स्तरावर योग्य दाता शोधण्याची संधी निर्माण होऊ शकते.
या उपक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे रक्तगट जुळत नसल्यामुळे प्रत्यारोपणापासून वंचित राहणाऱ्या रुग्णांना नवीन संधी उपलब्ध करून देणे, जिवंत दात्यांच्या माध्यमातून होणाऱ्या किडनी प्रत्यारोपणाची संख्या वाढविण्यास मदत करणे आणि अधिकाधिक रुग्णांना डायलिसिसवरील अवलंबित्व कमी करण्याची संधी देणे हा आहे. अर्थात, प्रत्यारोपणाची पात्रता वैद्यकीय तपासण्या आणि लागू कायदेशीर नियमांनुसार निश्चित केली जाते.

 

अजून बातम्या वाचा..

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये  रोबोटिक शस्‍त्रक्रियांचा नवा विक्रम ‘एएमएस एज’ प्रणालीद्वारे अवघ्या १०० दिवसांत १०० यशस्वी शस्त्रक्रिया

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये रोबोटिक शस्‍त्रक्रियांचा नवा विक्रम ‘एएमएस एज’ प्रणालीद्वारे अवघ्या १०० दिवसांत १०० यशस्वी शस्त्रक्रिया

नाशिकः येथील नामांकित 'एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटर'मध्ये रोबोटिक शस्‍त्रक्रियांचे नवनवीन विक्रम...

read more
किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
Breaking News