नाशिकः येथील नामांकित ‘एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर’मध्ये रोबोटिक शस्त्रक्रियांचे नवनवीन विक्रम नोंदविले जात आहेत. अत्याधुनिक ‘एएमएस एज’ या सर्जिकल रोबोट प्रणालीच्या सहाय्याने अवघ्या १०० दिवसांमध्ये १०० यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया पूर्ण करण्याचा नवा विक्रम हॉस्पिटलने प्रस्थापित केला आहे. यासंदर्भात एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर व किम्स मानवता हॉस्पिटल, सिक्स सिग्मा हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक तथा चीफ ऑफ सर्जिकल ऑन्कॉलॉजी ॲण्ड रोबोटिक सर्व्हिसेस प्रा. डॉ.राज नगरकर यांनी माहिती दिली.
अधिक माहिती देतांना डॉ.राज नगरकर म्हणाले, ही केवळ आकडेवारी नसून, विविध व्याधींनी त्रस्त रुग्णांच्या जीवनात आनंदाचे क्षण आणत त्यांच्या कुटुंबीयांना दिलेला दिलासा आहे. नेहमीच अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार उपलब्ध करुन देण्याचा मानस राहिलेला आहे. काळाची गरज लक्षात घेता, आम्ही रोबोटिक शस्त्रक्रियेसारखे आधुनिक तंत्रज्ञान नाशिकमध्ये उपलब्ध करुन दिले. या तंत्रज्ञानाचा किती व्यापक फायदा होतो आहे, हे आकडेवारीतून सिद्ध होते.
यापूर्वी रुग्णालयात कार्यरत असलेल्या सीएमआर व्हर्सियस या प्रणालीद्वारे २ हजार १०० पेक्षा जास्त रोबोटिक असिस्टेड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. या दोन्ही प्रणालींच्या माध्यमातून कर्करोगासह विविध गुंतागुंतीच्या उपचारांमध्ये रुग्णालयाने जागतिक दर्जाची कामगिरी नोंदवली आहे.
डॉ.राज नगरकर पुढे म्हणाले, “तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असून, आधुनिक तंत्रज्ञानामुळे अतिशय क्लिष्ट उपचार अधिक सुलभ व सुरक्षित करता येतात. आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे ही रुग्णांप्रती आमची कटिबद्धता आहे. केवळ नाशिक किंवा उत्तर महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातून आणि परदेशातूनही रुग्ण उपचारासाठी नाशिकला पसंती देत आहेत. या कामगिरीमुळे नाशिकमधील मेडिकल टुरिझमला मोठी गती मिळत आहे. या यशात संपूर्ण वैद्यकीय चमूचे योगदान असून, रुग्णांनी दाखवलेला विश्वास सर्वात महत्त्वाचा आहे.





