नाशिक: शेतीकडे केवळ पारंपरिक व्यवसाय किंवा छंद म्हणून न पाहता एक व्यावसायिक उपक्रम म्हणून पाहण्याची गरज आहे. शेतीतील उत्पादन, खर्च आणि मिळणारा नफा यांचा नियमित हिशेब ठेवल्यास शेती अधिक नियोजनबद्ध आणि फायदेशीर करता येईल, असे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केले.
कृषिथॉन २०२६मध्ये आयोजित प्रयोगशील शेतकरी, प्रयोगशील कृषी उद्योजक आणि प्रयोगशील कृषी विस्तार कार्य या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
शेती करताना बियाणे, खते, औषधे, मजुरी यांसह स्वतःच्या श्रमांचाही खर्च विचारात घेणे आवश्यक आहे. अनेक शेतकऱ्यांना उत्पादनातून मिळणारे उत्पन्न ठाऊक असते; मात्र त्यासाठी झालेला एकूण खर्च आणि प्रत्यक्ष नफा यांचा अचूक हिशेब नसतो. त्यामुळे प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र नोंदवही ठेवून दररोजचा खर्च आणि उत्पन्न नोंदवावे. हंगामाच्या अखेरीस त्यातून नफा-तोट्याचे गणित स्पष्ट होईल, असे तांबे यांनी सांगितले.
सोशल मीडियावरील माहितीचा वापर करताना तिची सत्यता तपासणे आवश्यक आहे. केवळ फॉलोअर्सची संख्या किंवा लोकप्रियता पाहून कोणाचाही सल्ला स्वीकारू नये. विशेषतः हवामान आणि शेतीविषयक माहिती घेताना शास्त्रीय आधार तपासावा, असे आवाहन त्यांनी केले.
शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच त्याचा योग्य वापर करण्याची जबाबदारीही शेतकऱ्यांची आहे. पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून पाण्याचे नियोजन आणि काटकसरीने वापर करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. शासन, निसर्ग आणि बाजारपेठेवर अवलंबून राहण्याबरोबरच शेतकऱ्यांनी स्वतःचे नियोजन आणि आर्थिक शिस्त विकसित करावी, असेही त्यांनी नमूद केले.
प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रयोगशील शेतकरी, प्रयोगशील कृषी उद्योजक आणि प्रयोगशील कृषी विस्तार कार्य या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुरस्कारप्राप्त शेतकरी आणि कृषी क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचे तांबे यांनी अभिनंदन केले. कृषिथॉनच्या आयोजनाबद्दल आयोजकांचेही त्यांनी कौतुक केले.
———————————————-
‘जलसंकटाच्या काळात शाश्वत सिंचन व्यवस्थापनाची गरज’
कृषिथॉनमधील परिसंवादात मान्यवरांचा सूर
नाशिक: बदलते हवामान, अनियमित पर्जन्यमान आणि मर्यादित जलस्रोतांच्या पार्श्वभूमीवर शेतीचे नियोजन करण्यासाठी जलसंधारण आणि पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन आवश्यक आहे. पावसाचे पाणी जमिनीत जिरविणे, पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून सिंचनाचे समन्यायी वितरण आणि हवामानातील बदलांचा अभ्यास करून शेतीचे नियोजन करावे, असा सूर कृषिथॉनमध्ये आयोजित ‘मर्यादित हवामान, मर्यादित जलस्रोत आणि सिंचन व्यवस्थापन’ या परिसंवादाचा होता.
जलतारा प्रकल्पाचे जनक पुरुषोत्तम वायाळ यांनी प्रकल्पाच्या माध्यमातून शेतात शोषखड्डे तयार करून पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याची संकल्पना मांडली. शेतातील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह आणि सखल भाग लक्षात घेऊन शोषखड्डे तयार केल्यास पावसाचे अतिरिक्त पाणी जमिनीत जिरण्यास मदत होते. त्यामुळे भूजलपातळी वाढण्याबरोबरच शेतात पाणी साचण्याची समस्या कमी होऊ शकते. प्रत्येक शेतात आणि गावपातळीवर अशा प्रकारचे जलसंधारणाचे प्रयोग राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. केवळ धरणे आणि तलावांमध्ये पाणी साठविण्याऐवजी जमिनीच्या पोटात पाण्याचा कायमस्वरूपी साठा निर्माण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेचे संस्थापक शहाजी सोमवंशी यांनी पाणी व्यवस्थापनातील शेतकरी सहभागाचे महत्त्व स्पष्ट केले. वाघाड प्रकल्पात पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून कालव्यांद्वारे पाण्याचे नियोजन आणि समन्यायी वितरण केले जाते. विशेषतः कालव्याच्या शेवटच्या टोकावरील शेतकऱ्याला आधी पाणी देऊन नंतर वरच्या भागाकडे पाणी सोडण्याच्या पद्धतीमुळे वितरणातील असमानता कमी झाली. पाण्याचे वार्षिक नियोजन, पाणीपट्टीची वसुली आणि शेतकऱ्यांचा सामूहिक सहभाग यामुळे परिसरातील शेतीचे चित्र बदलल्याचे त्यांनी सांगितले. कालव्याच्या पाण्यामुळे विहिरी आणि कूपनलिकांची भूजलपातळी वाढण्यासही मदत झाल्याचे त्यांनी नमूद केले.
हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी एल निनो, ला निना आणि ईएनएसओ या हवामानविषयक संकल्पना समजावून सांगितल्या. प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानातील बदल आणि वाऱ्यांच्या दिशेतील बदल यांचा जागतिक पर्जन्यमानावर परिणाम होतो. मात्र, एल निनो म्हणजे भारतात पाऊस पडणारच नाही, असा सरसकट अर्थ काढणे चुकीचे आहे. या परिस्थितीचा परिणाम इतर हवामान घटकांवरही अवलंबून असतो, असे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी सोशल मीडियावरील अप्रमाणित हवामान अंदाजांवर विश्वास न ठेवता भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत अंदाजांचा आधार घेऊन पेरणी आणि पीक नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रा. तुषार उगले यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. यावेळी शेतकऱ्यांनीही पाणी व्यवस्थापन, हवामान बदल आणि रब्बी पिकांच्या नियोजनासंदर्भात प्रश्न विचारून शंकांचे निरसन केले.
‘डाळिंब उत्पादनासोबत बाजारपेठेचेही नियोजन आवश्यक’
नाशिक : बदलत्या हवामानात डाळिंबाचे दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी पाणी व्यवस्थापन, फळधारणा, कीड-रोग नियंत्रण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर आवश्यक आहे. मात्र, केवळ उत्पादनावर भर न देता शेतकऱ्यांनी स्वतःच्या मालाचे विपणन आणि बाजारपेठेचे नियोजन करावे, असे आवाहन कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले. कृषिथॉनमध्ये आयोजित ‘बदलत्या हवामानात डाळिंब शेतीचे नियोजन आणि दिशा’ या परिसंवादात ते बोलत होते.
या सत्रात डाळिंब शेतीचे सल्लागार व प्रशिक्षक बाबासाहेब गोरे यांनी बदलत्या हवामानात बागेचे व्यवस्थापन करताना घ्यावयाच्या काळजीविषयी मार्गदर्शन केले. डाळिंब हे तुलनेने कमी पाण्यात येणारे फळपीक असले, तरी सिंचनाचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. बहारासाठी पाणी सुरू करताना पहिले पाणी योग्य प्रमाणात द्यावे. त्यानंतर मातीतील ओलाव्यानुसार सिंचन करावे. अतिपाणी आणि खतांचा अनावश्यक वापर टाळावा, असे त्यांनी सांगितले.
बागेतील तापमान, आर्द्रता आणि जमिनीतील ओलावा लक्षात घेऊन सिंचनाचे नियोजन करावे. मल्चिंग, क्रॉप कव्हर, फळांना योग्य प्रकारच्या बॅग लावणे, काट्यांची छाटणी आणि फळांची विरळणी यामुळे फळांचे संरक्षण होते. त्यामुळे गुणवत्ताही सुधारते. फळधारणेच्या सुरुवातीच्या टप्प्यात मधमाश्यांद्वारे होणारे परागीभवन महत्त्वाचे असते. त्यातून फळांतील दाण्यांची संख्या वाढण्यास मदत होते, असे गोरे यांनी स्पष्ट केले.
कीडरोग व्यवस्थापनासाठी बागेचे नियमित निरीक्षण करावे. रोग दिसल्यानंतर उपचार करण्यापेक्षा अनुकूल हवामानात प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अधिक प्रभावी ठरते. झाडाच्या क्षमतेनुसार फळांचा भार ठेवावा. अधिक उत्पादनाच्या नादात फळांची संख्या वाढवण्याऐवजी गुणवत्तेला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.
बाजारपेठ आणि विपणनाच्या मुद्द्यांवर बोलताना बापूसाहेब पिंगळे यांनी शेतकऱ्यांनी स्वतःच्या मालाची किंमत ठरवण्याची क्षमता विकसित करावी, असे सांगितले. आकार आणि गुणवत्तेनुसार डाळिंबाची प्रतवारी करून स्वतंत्र बाजारपेठ शोधावी. मोठ्या आकाराच्या फळांसाठी देशांतर्गत तसेच परदेशी बाजारपेठांचा अभ्यास करावा. व्यापाऱ्यांवर पूर्णपणे अवलंबून न राहता विपणनातील काही बाबी शेतकऱ्यांनी स्वतःच्या नियंत्रणात ठेवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
शेतकऱ्यांच्या मुलांनी निर्यात, प्रक्रिया उद्योग, पॅकिंग आणि विपणन क्षेत्रात पुढाकार घेऊन उद्योजक बनावे. त्यांना व्यापार आणि बाजारपेठेचे प्रशिक्षण देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
शेतकऱ्यांशी साधला संवाद
शेतकऱ्यांनी डाळिंब उत्पादन, फळांची गुणवत्ता, रोग व्यवस्थापन, बाजारपेठ आणि निर्यातीसंदर्भात विविध प्रश्न विचारले. मान्यवरांनी उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. शेतीमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांची निवड करून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कृषिथॉनमध्ये आज…
पहिले सत्र
विषय: कृषी क्षेत्राच्या विकासात कृषी सेवा केंद्रांची भूमिका
वेळ: सकाळी १० वाजता
वक्ते : कोमलजी शाह, कार्यकारी संचालक, एस.एम.एल. लिमिटेड
प्रमुख उपस्थिती : नरहरीजी झिरवाळ, मंत्री, अन्न व औषध प्रशासन.
दुसरे सत्र
विषय: हायटेक नर्सरी : शाश्वत शेतीचा पाया, प्रगतीची नवी दिशा
वेळ: दुपारी १.३० वाजता
वक्ते : ज्ञानेश्वर पालकर, मधुकर गवळी, माधव पाचोरकर, वीरेंद्र थोरात, तुषार उगले आणि प्रतीक मोरे.
संवादक : गणेश नाझीरकर, संचालक, फ्रुटवाला बागायतदार प्रा. लि.





