राष्ट्रीय स्पर्धेतही चांगली कामगिरी ही अभिमानाची बाब – मकरंद देव, बॅडमिंटन प्रशिक्षक
नाशिक : तिरूपूर, तामिळनाडू येथे दिनांक २६ ते ३० सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत दुसरे मानांकन मिळालेल्या नाशिकच्या श्रावणी वाळेकरने १३ वर्ष गटात दुहेरी प्रकारात मुंबईच्या तारिणी सुरीच्या साथीने आपल्या दर्जाला साजेसा असा सुंदर खेळ करत उपविजेतेपद पटकावले. .दुहेरीत धमाका – श्रावणीने तारिणी सुरीच्या साथीने खेळतांना प्राथमिक फेरीपासून आपला दबदबा दाखवून दिला. या जोडीने तामिळनाडूच्या प्रतीक्षा एस. के. आणि अंजलीन रामाणी यांचा २१- ०६ , २१ -१६ असे पराभूत केले. तर कर्नाटकाच्या मेघाश्री जी. एस. आणि रुजला रामू यांचा संघर्षपूर्ण लढतीत २१-०६, १५-२१ आणि २२-२० असा पराभव करून उपांत्यपूर्व7 फेरी गाठली. त्यानंतर झारखंडच्या सारस शर्मा आणि आध्या सिंग यांच्यांशी झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत श्रावणी – तारिणी यांनी पहिला सेट १६- २१ असा गमावल्यानंतरही आपापसात चांगला समन्वय साधून नंतरचे दोन सेट २१- ११ आणि २६- २४ असे जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीतही संघर्षपूर्ण खेळ करून या जोडीने हा सामना २१- १६, १४-२१ , आणि २१- १९ असा जिंकून अंतिम लढतीत प्रवेश केला. त्यांची अंतिम लढत प्रथम मानांकन असंलेल्या आंध्र प्रदेशच्या नाव्या कंदेरी आणि तेलंगणाच्या श्रीयांशी वालीशेट्टी यांच्याशी झाली. या सामन्यातही श्रावणी आणि तारिणी यांनी चांगली सुरवात करून ६- ६ अशी सुरवात केली. मात्र त्यानंतर त्यांना पहिला सेट २१- ०८ असा गमवावा लागला तर दुसऱ्या सेटमध्येही १२- १२ अश्या बरोबरीनंतर या जोडीला हा सेटही १६-२१ असा गमवावा लागल्यामुळे त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत एकेरीमध्ये खेळतांना श्रावणीने मुख्य फेरीत पाहिले दोन सामने जिंकून चांगली कामगिरी केली. श्रावणीची राज्य स्पर्धेतही सत्यातपूर्ण कामगिरी – .श्रावणीने यावर्षी नागपूर, पुणे आणि रत्नागिरी येथे झालेल्या तीन राज्य स्पर्धेत दुहेरीमध्ये तीनही विजेतेपद आणि एकेरीमध्ये दोन विजेतेपद मिळविले आहे. तिच्या या सत्यातपूर्व कामगिरीच्या आधारेच तिला राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे आणि या संधीचा लाभ घेत श्रावणीने या राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपद मिळवेल आहे ही अभिमानास्पद कामगिरी आहे आणि ती यापुढे आणखी चांगली मजल गाठेल असा विश्वास तिचे प्रशिक्षक मकरंद देव यांनी व्यक्त केला.
श्रावणी नाशिकच्या सिल्वर ओक शाळेत शिकत असून ती सहा वर्षांपासून शिवसत्य क्रीडा मंडळात मकरंद देव यांच्या मार्गदर्शनाखाली बॅडमिंटनचा नियमित सराव करत आहे. श्रावणीच्या या यशाबद्दल शिवसत्य क्रीडा मंडळाच्या हिमगौरी आहेर, नगरसेवक योगेश हिरे , अनंत जोशी, राधेश्याम मुंदडा, योगेश एकबोटे, आदिंनी तिचे अभिनंदन करून तीने अशीच प्रगती करून नाशिकचे नाव उज्वल करावे अश्या अपेक्षा व्यक्त केल्या.






