नाशिक,दि.४ नोव्हेंबर :-वक्तशीरपणा, स्पष्टवक्तेपणा, नेतृत्व, शिस्त, विद्वत्ता, नम्रता, धाडसीपणा, माणुसकी अंगीकृत असलेले सर्वगुण संपन्न असलेले व्यक्तिमत्व लहानपणापासून समाजसेवेचा वसा जोपासलेले सिन्नर भूषण सूर्यभान गडाख यांच्या निधनाने एक लोकनेता कायमचा हरपला असल्याच्या शोकभावना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहे.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की,माजी आमदार सूर्यभान गडाख यांनी औद्योगीकरणाशिवाय तालुक्यातील बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही हे ओळखून आशिया खंडातील पहिली सहकारी औद्योगिक वसाहत उभी करून सिन्नर सारख्या दुष्काळी भागातील जनतेला रोजगार उपलब्ध करून दिला. याशिवाय त्यांनी माध्यमिक लोकशिक्षण मंडळाची स्थापना करून तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडं खुली करून दिली.त्यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेले लोकप्रिय नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या निधनाने गडाख कुटुंबीय आणि सिन्नर तालुक्यातील जनतेवर दुःखाचा डोंगर कोसळला असून भुजबळ कुटुंबीय त्यांच्या दुःखात सहभागी असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.





