मुंबई : भारतीय पोलीस सेवा संवर्गातील अधिकाऱ्यांना त्यांचे वार्षिक अचल मालमत्ता विवरणपत्र भरणे आवश्यक असते. हे विवरणपत्र न भरलेल्या राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांची यादी केंद्र शासनाने पाठविली असून त्यातील कार्यरत नसलेल्या, मयत अधिकाऱ्यांची नावे वगळण्यात यावीत असे केंद्र शासनाला कळविण्यात येत आहे, अशी माहिती गृह विभागामार्फत देण्यात आली आहे.
राज्यातील काही शहीद पोलीस अधिकाऱ्यांकडे तसेच सेवानिवृत्त, खात्यातून कमी करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांकडून मालमत्तेचा तपशील मागविण्यात आल्यासंदर्भातील वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्या अनुषंगाने गृह विभागाने हा खुलासा दिला आहे.
भारतीय पोलीस सेवा संवर्गातील अधिकाऱ्यांना त्यांचे वार्षिक अचल मालमत्ता विवरणपत्र भरण्याकरीता एक ऑनलाईन प्रणाली केंद्र शासनाने विकसीत केली आहे. त्याबाबतची सुविधा SPARROW प्रणालीवर देण्यात आली आहे. सर्व कार्यरत भापोसे अधिकाऱ्यांना त्यांचे वार्षिक मालमत्ता विवरणपत्र 31 जानेवारीपूर्वी भरणे आवश्यक असते. सन 2018 मध्ये ज्या अधिकाऱ्यांनी त्यांचे वार्षिक विवरणपत्र SPARROW प्रणालीवर भरले नसतील अशा अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय गृह मंत्रालयाचे सचिव यांच्या अर्धशासकीय पत्राद्वारे राज्य शासनास कळविण्यात आली. तसेच सन 2019 चे मालमत्ता विवरणपत्र विहीत मुदतीत भरण्यात यावे, अशी सूचनाही राज्य शासनाला या पत्राद्वारे करण्यात आली होती. या यादीतील कार्यरत नसलेल्या, मयत अधिकाऱ्यांची नावे वगळण्यात यावीत असे केंद्र शासनाला कळविण्यात येत आहे, अशी माहिती गृह विभागामार्फत देण्यात आली आहे.




