|| स्वामी लीला ||
स्वामींनी “बंदरकिनाऱ्यावर किल्ला उभार..” हा हुकुम दिल्यानंतर स्वामीसुत स्वामी सेवेलाच लागले.. हृदयातील स्वामी अनुभवावर ते नेहमी रहात.. ह्या अनुभवावर राहून त्यांच्या मुखातून अभंगांची अभिव्यक्ती होत.. ह्या अभंगाने येणारे भाविक स्वामी भक्तीत रमून जात.. ह्या अभंगात स्वामी भक्ती होती.. स्वामींची ओळख होती.. समस्त मानवासाठी कल्याणकारी उपदेश होते.. कामाठीपु-यात स्वामीसुतांचा पहिला मठ होता.. त्या नंतर चिमाबाई बेलवाली नावाच्या सेवेकरीणीने कांदेवाडीत.. आपल्या चाळीत स्वामीसुतांस आणले.. तेथेही शेकडो लोक दर्शनास येवू लागले.. असेच कोणे एके दिवशी दिवशी काही मंडळी अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनास गेले असता.. स्वामी महाराजांनी त्यांच्याकडे बघितले आणि त्यांस बोलले कि, “ अरे, दर्याकिनाऱ्यावर जा !! ” असा उपदेश होताच… त्या मंडळींना समजले कि, स्वामी महाराज आपणास मुंबईला स्वामीसुतांकडे जाण्याची आज्ञा देत आहेत.. आणि त्या प्रमाणे ते मुंबईला स्वामीसुतांकडे आले.. येथे आल्यानंतर अक्कलकोट मध्ये जे जे काही घडले.. त्या बद्दलच्या स्पष्ट सांकेतिक खुणा स्वामीसुतांनी त्यांस दिल्या.. हे बघून सर्व मंडळीना आश्चर्य वाटले.. अशा असंख्य लीला स्वामी महाराज आणि स्वामीसुत करत होते.. ह्या मुळे स्वामीसुतांकडे येणाऱ्या मंडळीची श्रद्धा दिवसेंदिवस दृढ होत होती.. स्वामी भक्त हो !! स्वामीसुत हे स्वामी भक्तीत वेडे झालेले होते.. आणि त्या मुळे तेथील काही लोकांना स्वामीसुतांचे बोलणे–वागणे नाटकी वाटत होते.. ढोंग वाटत होते.. पण तेव्हाही स्वामीसुत त्या मंडळींना हास्यअभंगाद्वारे अतिशय नम्रतेने स्वामी भक्तीचाच उपदेश देत होते.. आणि त्यांस स्वामी महाराजांची गोडी लावत होते.. स्वामीसुतांनी अनेक लोकांना दीक्षा देवून स्वामीमय केले होते.. त्यात बाबा शेणवाई,गोविंदपंत केतकर,बाबा सिकाका, हरिचंद्र वगैरे मंडळी होती.. त्यावेळेला नरसोजी पारशी ह्या गृहस्थाचे डोळे गेले होते.. स्वामीसुतांनी त्यांचे डोळे बरे केले.. ह्या योगाने अनेक पारशी लोक स्वामीसुतांकडे येवु लागले.. आणि त्या सर्व लोकांना स्वामीसुतांनी स्वामीभक्तीस लावले.. अनेक नास्तिक लोकांना स्वामीसुतांनी स्वामीभक्तीस लावले.. स्वामी भक्त हो !! स्वामीसूतांना हे स्वामी भक्तीचे वेड लागले त्यावेळेला त्यांचे वय हे मात्र पंचवीस वर्षाचे होते.. ह्यावेळेला त्यांची आई.. काकूबाई ह्या कोकणात होत्या.. जेव्हा स्वामीसुतांचे हे सर्व तिला समजले.. तेव्हा ती रडतरडत मुंबईला आली.. काकुबाईने स्वतः स्वामीसूतांना समजवण्याचा प्रयत्न केला.. परंतु सर्व व्यर्थ !! आता त्यांनी आपल्या नातेवाईकांना एकत्र केले.. त्यांच्याकडून स्वामीसुतांना समजवण्याचा प्रयत्न केला.. परंतु तरीही सर्व व्यर्थ गेले.. कारण स्वामीसुतांची अवस्था हि “ ब्रम्हानंदी लागली टाळी.. कोण देहाते सांभाळी ” अशी झाली होती.. हे बघून कोणीतरी ह्यास भूतबाधा केली आहे.. असे त्यांस वाटू लागले.. तेव्हा काकूबाई ह्या सटाण्याचे देवमामलेदार ह्यांसकडे आले.. त्यांना काकूबाईंनी “आपला मुलगा शुद्धीवर आणा” अशी विनंती केली.. तेव्हा देवमामलेदार त्यांस हसून बोलेले कि, “हरीभाऊस जबरदस्त भूत लागलेले आहे.. ते कोणा देवाच्याने वा मंत्राने निघणार नाही !! ” हे उत्तर ऐकून काकूबाई निराश झाल्या.. आणि त्या मुंबईस आल्या.. स्वामी भक्तीचे वेड एकतर लागत नाही आणि लागले तर ते उतरत नाही.. थोडक्यात काकूबाईंचे सर्व प्रयत्न विफल झाले.. पुढे एके दिवशी स्वामीसुत अक्कलकोट येथे आले होती.. त्या वेळेला स्वामी महाराज राजवाड्यात होते.. स्वामी महाराज जेव्हा राजवाड्यात असत.. तेव्हा कोणालाही स्वामींचे दर्शन होत नसे.. स्वामी सूतांना स्वामी दर्शनाची तीव्र ओढ होती.. ती ओढ इतकी होती कि, आता आपल्याला स्वामींचे दर्शन होणार नाही हे समजताच.. स्वामीसुत राजवाड्यासमोर निराहार ठाण मांडून बसले.. स्वामी भक्त हो !! तीन दिवस अन्नपाणी त्यागून स्वामीसुत तेथे बसले आणि मुखातून अभंग बोलू लागले.. माझी माता तुमचे घरी !! म्हणुनी मी हो आलो द्वारी !! आम्हा नकी तुमचे काही ! स्वामीचरण दावा बाई !! स्वामीचरणाचे रज ! देवून तृप्त करा मज !! माझी माय आहे आत ! मज दाखवा त्वरित !! माय सोडुनिया बाळ ! कैसा घालवील काळ !! आम्ही जाउनिया आंत ! तुमचे काही नाही नेत !! प्रेमपान्हा देऊनी सोडा ! गात येऊ हो पवाडा !! स्वामीसुत म्हणे आई ! बाळा भेटवावे बाई !! स्वामी भक्त हो !! इतकी तळमळीची.. व्याकुळतेची शुद्ध भक्तीची प्रार्थना ऐकताच स्वामी आईचे हृद्य पाझरले आणि चोथे दिवशी जशी गाय आपल्या वासराकडे धावून येते.. अगदी तसे स्वामी महाराज कळवून बाहेर धावत आले.. आणि त्यांनी स्वामी सुतांस राजवाड्यात नेले.. तेव्हा पासून स्वामीसुतांस राजवाड्यात जाण्याची परवानगी मिळाली.. थोडक्यात खरी शुद्ध अनन्य भक्ती असेल.. प्रेम असेल तर ईश्वराला धावत यावेच लागते ह्याची अक्कलकोटवासियांनी प्रचीती घेतली.. हे स्वामी सुतांचे रसाळ चरित्र आपण पुढील स्वामी वाणीत ऐकुया… तो पर्यंत
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
||स्वामी बोध ||
आजच्या लीलेतून मनन चिंतन केले असता आपल्याला एक लक्षात येते कि, स्वामी सुत हे भक्ती अवतार होते.. अनन्य भक्तीचा आदर्श होते.. जेव्हा अनन्य भक्ती कृतीशील होते.. तेव्हा तिचे सेवेत रुपांतर होती.. आणि ह्या साठी जे शरीर निमित्त बनते त्या शरीराला सेवेकरी म्हणतात.. ‘ सेवेकरी ’ ह्या उक्तीची व्याप्ती खूप खोल आहे.. स्वामीसुतांच्या जीवनाचा अभ्यास केला असता आपल्या त्याची खूप छान समज भेटते.. बघा !! त्यांची भक्ती फक्त भावनिक तळावर नव्हती.. तर ती प्रत्यक्ष कृतीत होती.. आणि म्हणूनच जेव्हा कोणी अक्कलकोट येथे येई त्याला स्वामी महाराज “दर्या किनाऱ्यावर जा !! ” अशी आज्ञा देत.. अर्थात स्वामीसुतांच्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरु आहे.. तो ग्रहण करण्यासाठी जा.. असा स्पष्ट आदेश स्वामी महाराज सर्वाना देत होते.. कारण स्वामीसुतांचे शरीर हे स्वामीकार्यासाठी पात्र झालेले होते.. त्या शरीरांमध्ये ईश्वरीय गुण चमकत होते.. बघा !! जसे कोणी त्यांची टीका करत.. कोणी ढोंगी म्हणत.. परंतु त्यांच्यावर कोणताच परिणाम होत नव्हता.. कारण स्वामींनी त्यांच्यावर जो पूर्णानुग्रह केला त्यात .. खरा आनंद हा आपल्या अंतरंगात आहे.. ह्या बोध स्वामींनी त्यांना दिला होता… आणि म्हणूनच बाह्य टीका वा स्तुती मधून भेटणाऱ्या खोट्या आनंदाची त्यांना अपेक्षा नव्हती.. वा पर्वाच नव्हती.. वा त्याने त्यांचे मन विचलित होत नव्हते.. ह्या सह राजवाड्याच्या बाहेर निराहार राहून.. व्याकुळतेने आळवून.. अभंगाच्या रूपाने त्यांनी स्वामी अनन्य भक्तीची अभिव्यक्ती केली.. त्यातून तुम्हा आम्हा सर्वांस हा अगदी स्पष्ट संदेश दिला कि, “अनन्य भावनेने स्वामींना आळवल्यास.. स्वामींना यावेच लागते.. किंबहुना स्वामी येतातच..!! ” म्हणून ह्या प्रसंगातून बोध घेता.. पुन्हा आपणास जर खरोखर स्वामीकृपा हवी असेल तर आपल्यात स्वामी कृपेची खरोखर तहान आहे का ? ती दृढ इच्छाशक्ती आहे का ? ह्याचे मनन चिंतन करायचे आहे.. आणि एकदा कि मनन चिंतन केले कि, आपल्याला अनन्य भक्तीच्या वरच्या पायरीवर जायचे आहे.. स्वामी भक्त हो !! स्वामींच्या लीला आणि त्यात असलेला बोधाचा खजाना असीम अनंत आकाशा प्रमाणे आहे.. कि ज्याला खोली नाही.. उंची नाही.. कोणताच किनारा नाही.. परंतु जितके तू लागलीच पचेल.. रुचेल तितके मांडण्याचा प्रयत्न होत आहे.. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे श्री गुरुसमर्था !! तू आई आहेस.. आम्ही तुझे बाळ आहोत.. तुला अनन्य भावनेने आळवीताच तु क्षणाचाही विलंब न करता धावत येतोस.. तुला मात्र अनन्य प्रेम हवे आहे.. तु भक्ती भावनेचा भुकेला आहे.. हे परब्रम्हा !! आजच्या स्वामीसुतांच्या लीलेतून आम्हाला हि अनन्य भक्तीची प्रेरणा दिली.. समज दिली.. तुला अनंत कोटी धन्यवाद !! तुला अनंत कोटी धन्यवाद स्वामी !!! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!






