नाशिक – राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाशिकची ओळख शांत आणि प्रगतिशील औद्योगिक शहर अशी अधिक प्रभावी पणाने होण्यासाठी मी नाशिककर या अराजकीय चळवळीच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला असून त्यासाठी नाशिकमधील कामगार संघटना , औद्योगिक संघटनाचे प्रतिनिधी , शासकीय अधिकारी आणि मी नाशिककर चे सदस्य यांची एक बैठक नुकतीच पार पडली.
सुमारे ३ वर्षांपूर्वी नाशिकमधील विविध उद्योग क्षेत्रात अग्रणी तसेच नाशिकमध्ये काम करणा-या विविध २७ व्यावसायिक संघटनाचे सक्रीय व्यावसायिक यांनी मी नाशिककर या अराजकीय चळवळीस सुरवात केली. नाशिककरांना व्यवसाय आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यासाठी, नाशिकमध्ये मोठे उद्योग, आयटी व नवे व्यवसाय आले पाहिजे या उद्देशाने हि चळवळ सुरु झाली.
जर नाशिक औद्योगिक क्षेत्र शांत असेल तर मोठे उद्योग नाशिकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित होतील यासाठी इएसडीस चे संस्थापक पियुष सोमाणी ,सिटू चे डॉ डी एल कराड व श्रमिक सेनेचे सुनील बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीत एक बैठक झाली. मी नाशिककर चे समन्वयक संजय कोठेकर आणि मार्गदर्शक डॉ उदय खरोटे यांनी या बैठकीचे नियोजन केले होते .या बैठकीमध्ये बॉश कामगार संघटनेचे अरुण भालेराव, पिफनर चे डी के शिंदे, महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे जाधव, व्यवस्थापक अशोक सोनावणे, निमाचे मंगेश पाटणकर ,आयमाचे मनिष रावल व कामगार आयुक्त विकास माळी हे उपस्थित होते.
या बैठकीत खालील मुद्यांवर एकमत झाले.
१) नाशिक औद्योगिक क्षेत्रात शांतता नांदून प्रगतीपथावर जाण्याचा संकल्प.
२) नाशिकचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ व केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार यांना भेटून शांत व प्रगतीशील औद्योगिक नाशिक हि प्रतिमा राज्य व राष्ट्रीय स्तरावर नेण्याची विनंती करणे .
३) करोना काळात बंद पडलेल्या उद्योगातील कामगारांचे पुनर्वसन व प्रशिक्षण.
४) स्थानिक स्वराज संस्थाकडे उद्योगासाठी पायाभूत सोयी उभारण्यासाठी पाठपुरावा.
५) उद्योगांनी मनुष्यबळासाठी योग्य व सकारात्मक निर्णय घ्यावे तसेच मध्यम व लहान उद्योगाकरिता मनुष्यबळ या विषयावर पुस्तिका प्रकाशित करावी.
६) उद्योगांना विस्तारीकरणासाठी शासकीय योजनांची माहिती द्यावी.
७) मैत्री पोर्टल बाबत जागरूकता करणे.
८) स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षण केंद्र तसेच ऑनलाईन नोकरीविषयक माहिती देण्याची सोय करणे.
९) दर ३ महिन्यांनी रोजगार मेळ्याचे आयोजन करणे.
१०) मोठ्या उद्योगासाठी मोठी जागा मिळावी यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे पाठपुरावा.
मी नाशिककर या चळवळी बाबत अधिक माहिती साठी – http://www.nashik-2.org/index.html





