नाशिक –कोणत्याही समारंभाचे महत्वपूर्ण अंग असणा-या कॅटरिंग व्यावसायिकांची संस्था कॅटरिंग असोसिएशन ऑफ नाशिक तर्फे येत्या ६ एप्रिल (बुधवार) रोजी राज्य स्तरीय अधिवेशन व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे समन्वयक राहुल भावे यांनी दिली.
सुमारे ५ वर्षांपूर्वी स्थापन झालेली कॅटरिंग असोसिएशन ऑफ नाशिक हि संस्था महाराष्ट्र स्टेट कॅटरिंग फेडरेशन तसेच फेडरेशन फॉर ऑल इंडिया कॅटरर्स यांच्या सोबत संलग्न असून कॅटरिंग व्यवसायातील अडीअडचणी सोडविणे तसेच सदस्यांच्या व्यावसायिक व ज्ञानवृद्धी साठी प्रयत्न करते.
नाशिकमध्ये ६ एप्रिल रोजी आयोजित या अधिवेशन व परिसंवादामध्ये राज्यातील कॅटरर्स तसेच फूड व्यवसायातील व्यावसायिक सहभागी होणार आहेत.
अधिवेशनात देशातील कॅटरिंग उद्योगातील नामवंत वक्त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये तब्बल ९० मिनिटे डोळे बंद करून स्वयंपाक करण्याचा विक्रम करणारे शेफ पराग कान्हेरे, प्रसिद्ध प्रशिक्षक अतुल ठाकूर व नॅशनल असोसिएशन ऑफ कॉर्पोरेट कॅटरिंग चे राष्ट्रीय अध्यक्ष गुरुविंदर बिंद्रा हे सभासदांना कॅटरिंग विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या सोबतच कॅटरिंग उद्योगासाठी लागणारे विविध आधुनिक उपकरणे, सामग्री यांचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले असून यामध्ये देशाच्या विविध शहरातील उत्पादक सहभागी होणार आहेत.
लाईव्ह ब्लाइंन्ड कुकिंग शो :-
डोळे बंद करून थ्री कोर्स मेनू चा स्वयंपाक करणा-या विक्रमी शेफ पराग कान्हेरे यांचा लाईव्ह शो देखील दुपारी १ वाजता आयोजित केला असून हि अनोखी कला बघण्याची संधी देखील नाशिककरांना उपलब्ध होणार आहे.
पपया नर्सरी जवळील डेमोक्रासी रिसोर्ट येथे आयोजित या अधिवेशनाचा शुभारंभ ६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता होणार असून ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चालेल. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीच्या वैभव नातू, नितीन जोशी, अमर वाणी, प्रसाद राजोळे, अनिकेत गाढवे, स्वप्नील शिंदे, सागर वडजे, नितीन सोनार, सागर गाढवे या सर्वांना श्री उत्तम गाढवे यांचे मार्गदर्शन आणि विशेष सहकार्य लाभत आहे.





