नाशिकः जागतिक तंबाखू प्रतिबंध दिन (नो टोबॅको डे) दिनानिमित्त मंगळवारी (दि.३१) विविध उपक्रम पार पडले. एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर यांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमांतून तंबाखूचे धोके विशद करतांना जनजागृती करण्यात आली. यावेळी रॅलीतून प्रबोधन केले. तसेच या दिनानिमित्त मोफत कर्करोग तपासणी शिबिराचेही आयोजन केले आहे.
मंगळवारी (दि.३१) सकाळी जिल्हा शासकीय रुग्णलाय येथे एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर आणि जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या वतीने रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक व चीफ ऑफ सर्जिकल ऑन्कॉलॉजी ॲण्ड रोबोटिक सर्व्हीसेस प्रा. डॉ. राज नगरकर, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, महाराष्ट्र पदव्युत्तर महाविद्यालय व संशोधन केंद्रचे अधिष्ठाता मेजर जनरल डॉ. एस. के. झा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, शिक्षण विभागाच्या सहायक संचालक पुष्पावती पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. जिल्हा शासकीय रुग्णलय येथे २४ मेपासून तपासणी शिबिर सुरु असून, येत्या ७ मेपर्यंत मोफत स्वरुपात कर्करोगाची चाचणी केली जाणार आहे.
तसेच नाशिकरोड परीसरातील बिटको रुग्णलाय येथे नाशिक महानगरपालिका आणि नाशिक सर्जिकल सोसायटी यांच्या सहकार्याने सकाळी उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. राज नगरकर यांच्यासह नाशिक सर्जिकल सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. शिल्पा दयानंद काळे, सचिव डॉ. संतोष रावलानी व अन्य मान्यवर उपस्थित होते. बिटको रुग्णालयात मंगळवारपासून कर्करोग तपासणी शिबिर सुरु झाले असून, नागरीकांना या मोफत शिबिराचा लाभ १४ जूनपर्यंत घेता येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

बालकांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवणे ही सामाजिक जबाबदारीः डॉ.नगरकर
अल्पवयीन मुलांमध्ये विविध माध्यमातून तंबाखूचे सेवन ही गंभीर बाब आहे. कुटुंबातील ज्येष्ठांना तंबाखूचे सेवन करतांना पाहून, किंवा खरेदीसाठी मुलांना पाठविले जात असल्याने न कळतपणे मुलांमध्ये तंबाखूचे व्यसन जडते. बालकांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे, असे मत डॉ. राज नगरकर यांनी व्यक्त केले. पर्यावरण रक्षणासाठी तंबाखू शेतीला पर्याय म्हणून बांबू लागवड करत उत्पादनच शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.





