महिलांनी आपले हक्क समजून घेऊन समाजाला दिशा द्यावी – अॅडव्होकेट राजेश्वरी बालाजीवाले
नाशिक : गोखले एजुकेशन सोसायटीचे बी. वाय. के. (सिन्नर) वाणिज्य महाविद्यालय नाशिक येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे अंतर्गत विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी ” निर्भय कन्या कार्यशाळा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तीन सत्रात विभागणी करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये प्रथम सत्रात अॅडव्होकेट राजेश्वरी बालाजीवाले यांनी विद्यार्थिनींना महिलाच्या हक्काच्या कायद्याविषयी बहुमोल असे मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात डॉ. गीता येवलेकर यांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसे जपावे, आहार आणि विहार कसा असला पाहिजे या विषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. तर कार्यशाळेच्या तृतीय आणि शेवटच्या सत्रात श्रीमती गीता गायकवाड यांनी स्वसंरक्षणाविषयी सखोल माहिती दिली. तसेच कोणत्याही वाईट परिस्थितीत स्वसंरक्षण कसे करता येईल याविषयी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. त्यांच्या हस्ते प्रमुख वक्त्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी मंच प्रमुख प्रा. अनुराधा मोरे यांनी केले. या कार्यशाळेचे आयोजन प्रमुख म्हणून विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. पंकज बावणे यांनी जबाबदारी पार पडली. या कार्यशाळेचे आभार प्रदर्शन महिला सक्षमीकरण कक्ष प्रमुख प्रा. मेघा खैरनार यांनी केले. ही कार्यशाळा यशस्वी होण्याकरिता उपप्राचार्य डॉ. प्रसाद कुलकर्णी, उपप्राचार्या डॉ. लीना भट महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.





