मनोरंजन कार्यक्रमाला महिलांचा प्रतिसाद
नाशिक : द्राक्षापासून बनविलेल्या एकाहून एक सरस डिशेस् पाहून उपस्थितांच्या तोंडाला पाणी सुटले होते. सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, सुप्रसिद्ध शेफ प्राजक्ता पै. शहापूरकर यांनी द्राक्षापासून नानाविध डिशेस् साकारल्या. यानंतरच्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कलाकार भारत गणेशपुरे आणि सुप्रसिद्ध कलाकार योगेश शिरसाठ या जोडीने उपस्थितांची भरपुर मनोरंजन केले. पाककृती स्पर्धेसह द्राक्षांपासून दागिने बनविण्याच्या स्पर्धेला महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
जागतिक महिला दिनाला राजीव नगरच्या युनिक मैदानावर या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाद्राक्ष महोत्सव २०२३ च्या व्यासपीठावर महिलांसाठी स्पर्धा व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ग्रीनफिल्ड ॲग्रो सर्व्हिसेस व युनिक ग्रुप, राजीवनगर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमासाठी माजी सभागृह नेते नगरसेवक सतिष बापू सोनवणे व ग्रिनफिल्ड अँग्रोचे अमोल गोर्हे यांचे मार्गदर्शन व उपस्थिती लाभली.
यावेळी सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आणि सुप्रसिद्ध शेफ प्राजक्ता पै. शहापूरकर यांनी द्राक्षापासून लोणचे, मुरबा, पुलाव, बर्फी, अंगूर क्नॉकआउट, अंगुर कलाकन, अंगूल मलाई, अंगूर मोदक असे विविध लज्जतदार पदार्थ उपस्थित महिलांसोबत साकारतांना त्यांना याविषयीच्या रेसिपीज्ची माहिती देण्यात आली. महिलांशी संवाद साधतांना विष्णू मनोहर म्हणाले, की कल्पकतेना भरपूर वाव असतांना द्राक्षापासूनचे विविध पदार्थ बनवत त्याची साठवणूक करता येऊ शकते. व आवश्यकतेनुसार या पदार्थांचा आस्वाद घेता येऊ शकतो. नागपूरमध्येही अशा स्वरुपाचा कार्यक्रम घेतांना नाशिकच्या शेतकर्यांकडून थेट नागपूरला द्राक्ष उपलब्ध करुन दिले जातील.
यानंतर ”चला हवा येउद्या’ फेम’ सुप्रसिद्ध कलाकार भारत गणेशपुरे आणि योगेश शिरसाठ यांनी उपस्थितांचे निखळ मनोरंजन केले. आपल्या विनोदी शैलीतून त्यांनी संवाद साधतांना लोटपोट हसविले. अविस्मरणीय असा महिला दिन साजरा झाल्याची भावना उपस्थित महिला वर्गाने व्यक्त केली.
कार्यक्रम आयोजनामागील भूमिका सतिश बापू सोनवणे यांनी मांडली. यापुढेही अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तर अमोल गोर्हे यांनी महाद्राक्ष महोत्सवाची माहिती देतांना भेट देत द्राक्षांचा आस्वाद घेण्याचे आवाहन केले.





