नाशिक : ३१ मे रोजी जागतिक ”नो टोबॅको डे” म्हणून सर्वत्र राबविला जातो. तंबाखूमुळे कर्करोग होतो याबाबतची जनजागृती करुन लोकांनी तंबाखू व तत्सम मादक द्रव्यांपासून दूर राहावे म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन,नाशिक द्वारा दरवर्षी जनजागृती केली जाते.
या वर्षी We Need, Not Tobacco हया थीमला अनुसरुन आयएमए,नाशिकने जनजागृती करुन देशाला अन्नाची गरज जास्त असून तंबाखू ऐवजी जास्तीत जास्त अन्नधान्याचे उत्पादन करण्याचे आवाहन केले आहे.यासाठी जिल्हयातील कर्करोग तज्ञ संघटनेने एकत्र येउन विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.ज्यात तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम, विविध कर्करोग, कर्करोगाचे लक्षणे आणि उपचार हयाविषयी व्याख्यानं,रेडिओ वरील कार्यक्रम, वृत्तपत्रातून लेख आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आली आहेत.
याबाबत अधिक माहिती देत आयएमएचे अध्यक्ष विशाल गुंजाळ म्हणाले की, तंबाखू सेवन जीवघेणे आहे हे तरुणाईला वेळेवर समजावून सांगणे काळाची गरज आहे. घरातील सदस्यांनी व्यसनी व्यक्तीला विविध मार्गांचा अवंलब करुन त्याची तंबाखू सोडविणे गरजेचे आहे. आज अनेक लहान तरुण युवक युवती तंबाखूच्या आहारी जात आहे.हे थांबविणे सगळयात महत्वाचे आवाहन आहे. ”
हया वेळी आयएमएचे सचिव तसेच खजिनदार डॉ.पंकट भट, उपाध्यक्ष डॉ.मनिषा जगताप, डॉ.भूषण नेमाडे, सहसचिव डॉ.प्रेरणाशिंदे, डॉ.सागर भालेराव आणि सह खजिनदार डॉ.निलेश जेजुरकर, डॉ.मुकुल घरोटे, डॉ.अमोल काळे, डॉ.नागेश मदनुरकर, डॉ.अश्विनी नागरगोजे आदि उपस्थित होते.





