नाशिकच्या आशा वेणुगोपाल यांना बहुमान ; येत्या १ जुलै रोजी पदभार स्वीकारणार
नाशिक : गेल्या ११८ वर्षापसून जगभरात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रोटरी च्या डिस्ट्रीक्ट ३०३० साठी २०२३-२४ च्या प्रांतपाल म्हणून नाशिक च्या रोटे. आशा वेणुगोपाल यांची निवड झाली असून रोटरी डिस्ट्रीक्ट ३०३० च्या इतिहासातील त्या पहिल्या महिला प्रांतपाल आहेत . प्रांतपाल म्हणून त्या १ जुलै रोजी पदभार स्वीकारणार आहेत .
भारतात एकूण ३९ रोटरी डिस्ट्रीक्ट कार्यरत असून त्यातील डिस्ट्रीक्ट ३०३० हा एक आघाडीचा डिस्ट्रीक्ट आहे.ह्या रोटरी डिस्ट्रीक्ट ३०३० चे कार्यक्षेत्र नाशिक, सिन्नर ,मालेगाव ,मनमाड, जळगाव,वर्धा, अकोला,अचलपूर,शेगाव,नागपूर, चंद्रपूर,हिंगणघाट असे असून या भागातील १०४ क्लबमधील हजारो रोटरी सदस्य सामाजिक काम करीत आहे
पदभार स्वीकारण्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलतांना रोटे. आशा वेणुगोपाल म्हणाल्या की, ” रोटरी च्या विविध सामाजिक कार्यापासून प्रभावित होऊन त्या २०१० मध्ये रोटरी च्या सदस्य झाल्या . त्या नंतर त्यांनी रोटरी मध्ये विविध जबाबदारी सांभाळल्या .समाजसेवेची आवड , परिवाराची साथ आणि रोटरी सारख्या नामवंत संस्थेचे व्यासपीठ या मुळे पोलिओ निर्मुलन, साक्षरता,वैद्यकीय व आर्थिक दुर्बलानासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.”
प्रांतपाल म्हणून आपल्या आगामी वर्षातील योजनांची माहिती देतांना त्या म्हणाल्या की या वर्षी रोटरी चे जागतिक अध्यक्ष यांचे ब्रीदवाक्य ” क्रियेट होप इन द वल्ड ” असे आहे. त्यास अनुसरून रोटरी डिस्ट्रीक्ट ३०३० मधील उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. या उपक्रमांमध्ये महिला , मुली तसेच समाजातील उपेक्षित घटकांमध्ये आशेचा किरण जागविण्याचा प्रयत्न केला जाईल. साक्षरता, प्रौढ साक्षरता, पर्यावरण, आरोग्य,आरोग्य सुविधा,महिला सक्षमीकरण,पोलियो निर्मुलन हा वर प्रामुख्याने उपक्रम राबविण्यात येतील असे त्यांनी नमूद केले.
पाण्याच्या संवर्धनाचे आणि पाणी साठवणुकीचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवण्याचा त्यांचा मानस असून वाहत्या पाण्याबरोबर शेती साठी उपयुक्त अशी माती वाहून जाण्यापासून रोखून शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त असे प्रकल्प राबवण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली.
या शिवाय गरजू रुग्णांसाठी डायलिसिस सेंटर, महिला आणि लहान मुलांसाठी ह्युमन मिल्क बँक असे स्थायी प्रकल्प उभारण्याचा मानस पण आशा वेणुगोपाल यांनी व्यक्त केला.
सामाजिक उपक्रमाची सुरवात म्हणून पदग्रहण सोहोळ्याच्या दिवशीच गरजू विद्यार्थ्यांना ५ हजार सायकलींचे वाटप या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात सुमारे एक हजार सायकलींचे वाटप केले जाईल या प्रकल्पाचे उद्दिष्ट गरजू विद्यार्थ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे जेणेकरून ते कोणत्याही अडथळ्याशिवाय शिक्षण घेऊ शकतील.
गव्हर्नर (प्रांतपाल) पदाचा पदभार :- ” शनिवार दिनांक ०१ जुलै २०२३ रोजी मावळते प्रांतपाल रोटे आनंद झुनझुनवाला ह्याच्याकडून रोटेरियन आशा वेणुगोपाल डिस्ट्रीक ३०३० च्या गव्हर्नर (प्रांतपाल)पदाचा पदभार स्वीकारतील .हा सोहळा नाशिक मधील रॅडीसन ब्लू ह्या हॉटेलमध्ये होणार आहे.”





